लम्पी'च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’ | पुढारी

लम्पी'च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’

नाशिक : नितीन रणशूर
राज्यात लम्पी स्किन डिसीज अर्थात एलएसडी या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. मराठवाडा-विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील पशुधन एलएसडीच्या विळख्यात सापडले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एलएसडीचा शिरकाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’चा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुका वसला आहे. या तालुक्याला निसर्गाचे मोठे कोंदण लाभले असून, याच परिसरात कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्याचा विस्तार झाला आहे. घाटघर, साम—द, उडणावणे, पांजरे, रतनवाडी, कोळतेमभे, अंबित, पाचनई, कुमशेत, लव्हाळी, शिरपुंजे, कोथळे, सातेवाडी, फोपसंडी आदी 26 गावांचा अभयारण्यात समावेश आहे. या अभयारण्य क्षेत्रात नीलगाय-सांबर यासारखे तृणभक्षक प्राणी तसेच इतर वन्यजीव आढळून येतात. कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात गाय – म्हैस आदी पाळीव जनावरे राखली जातात. राज्यात सर्वत्र या पाळीव प्राण्यांना ‘लम्पी’ची लागण होत असल्याने अभयारण्यातील तृणभक्षक प्राण्यांनाही संसर्ग होण्याचा धोका कायम आहे.

राज्य शासनाने जनावरांच्या आठवडे बाजारांवर बंदी आणली असून, पशुपालकांकडून परस्पर जनावरे विक्रीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात बाहेर पाळीव जनावरे आणण्यास मनाई केली आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात इतर ठिकाणांहून येणार्‍या पाळीव जनावरांवर विशेष वॉच ठेवण्यात येत आहे. वन्यजीव विभागाचे चेकपोस्टवर प्रत्येक वाहनांची तपासणी वनकर्मचार्‍यांकडून केली जात आहे. तसेच ग्रामस्थांमध्येही इतर ठिकाणचे पाळीव जनावरे न आणण्यासह ‘लम्पी’ आजाराबाबत वन्यजीव विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने अभयारण्य क्षेत्रात चराई बंदीचा आदेश लागू आहे. ‘लम्पी’चा तृणभक्षक प्राण्यांना धोका ओळखून विशेष खबरदारी घेतली जात आहे. अभयारण्य क्षेत्रात बाहेरील जनावरांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
– गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक,
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

लसीकरणावर देतोय भर 

‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या लसीकरणावर वन्यजीव विभागाकडून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून भर दिला जात आहे. लसीकरणाचा खर्च वन्यजीव विभाग करणार आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात 20 हजार पाळीव जनावरांची नोंद असून, लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

हेही वाचा :

Back to top button