चांदणी चौकात१४ लेनचा रास्ता; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवाळीनंतर सुटणार | पुढारी

चांदणी चौकात१४ लेनचा रास्ता; पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवाळीनंतर सुटणार

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : मुंबई-बंगळुरू द्रुतगती महामार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडल्यानंतर दोन महिन्यांत तेथे सध्याच्या 4 लेनऐवजी 14 लेनचा रस्ता उपलब्ध होणार आहे. मध्यभागी महामार्गाच्या सहा लेन, तर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार लेनचे सेवारस्ते होणार आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दसर्‍यानंतर कमी होईल, तर दिवाळीनंतर पूर्णपणे सुटणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेमुळे गणेशोत्सवानंतर हा पूल पाडण्याचे ठरले होते. महापालिकेने पुलावरील जलवाहिनी स्थलांतरित केली. पूल पाडण्यासाठी त्यावर ड्रिल पाडण्याचे काम पूर्ण झाले. त्यावर तसेच पुलाच्या  भिंतींना लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सोमवारी सुरू असल्याचे ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले.  पूल पाडण्यास विलंब होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यालगतच्या सेवारस्त्यासाठी खडक फोडण्याचे काम हाती  घेतले. दोन्ही बाजूला सेवारस्ते तसेच रॅम्प बांधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

नऊऐवजी चार लेनमधून वाहतूक
चांदणी चौकातील पुलाखाली चार लेन आहेत. महामार्गाच्या सहा लेन तसेच कोथरूड, वारजे, मुळशी, पाषाण, बावधन येथून चौकात येणारी वाहने लक्षात घेता या ठिकाणी सुमारे नऊ लेनमधून येणारी वाहने पुलाखालून चार लेनमधून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे सध्याचा पूल पाडून तेथे पुढील सहा महिन्यांत सहा लेनचा पूल बांधण्यात येणार आहे. पूल पाडल्यानंतर त्यालगत दोन्ही बाजूला 16 मीटर रुंदीचा खडक फोडण्यात येईल.

नवीन पुलाखालून मुळशी, मुंबईकडून कोथरूडकडे जाण्यासाठी स्वतंत्र चार लेनचा तसेच वारजेकडून मुंबईकडे जाण्यासाठी चार लेनचा सेवारस्ता करण्यात येणार आहे. मुख्य महामार्गाला सहा मीटरच्या दोन लेन वाढतील. महामार्गाच्या चारच्या सहा लेन दहा दिवसांत सुरू केल्या जातील. दोन्ही सेवारस्ते एक-दोन महिन्यांत बांधण्यात येतील. ही कामे झाल्यानंतर तेथे चौदा लेन उपलब्ध होतील आणि वाहने वेगाने मार्गस्थ होतील.

भूसंपादनाचे अडथळे
वारजे बाजूला वेदभवनलगतची जागा, कोथरूडच्या बाजूला शृंगेरीपीठाची जागा, तर मुळशीकडून मुंबईकडे जाणार्‍या नवीन मार्गावर दोन ठिकाणी भूसंपादन अद्याप झालेले नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे तीन ठिकाणी सेवारस्त्याची कामे अडली आहेत. शृंगेरीपीठ येथील 548 चौरस मीटरपैकी मोकळी 338 चौरस मीटर जागा मिळाली असून, तेथे रस्तारुंदीकरण सुरू झाले आहे.

पूल पाडणार येत्या रविवारी
नोएडा येथे टि्वन टॉवर पाडणार्‍या कंपनीकडे चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सोपविण्यात आले. गणेशोत्सवानंतर त्यांनी पुलावर स्फोटके ठेवण्यासाठी ड्रिलिंग केले. पूल तसेच त्याच्या भिंतींना लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आज सुरू होते. पूल 1 ऑक्टोबरला रात्री पाडायचा की 2 ऑक्टोबरला पहाटे पाडायचा, याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे. पूल पाडल्यानंतर सात-आठ तासांत राडारोडा हलवून रस्ता वाहतुकीला उपलब्ध करण्यात येणार आहे.

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर तेथे महामार्गासाठी सहा लेन, तर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार लेनचे सेवारस्ते अशा एकूण 14 लेन उपलब्ध होतील. हा 397 कोटी रुपयांचा प्रकल्प 2.4 किलोमीटर लांबीचा आहे. तेथे आठ रॅम्प व दोन रोटरी करण्यात येतील. येथील रस्त्याचे एकूण काम सुमारे 16 किलोमीटरचे झाले आहे.

              – अंकित यादव, व्यवस्थापक (तांत्रिक), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Back to top button