Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अखेर अटक | पुढारी

Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अखेर अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडाळा गावात पतीचा भोसकून खून करून मृतदेह घरात पलंगाखाली ठेवून फरार महिलेस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने येवला येथून ताब्यात घेतले आहे. नंदाबाई दिलीप कदम असे या संशयित महिलेचे नाव आहे.

वडाळा गावातील माळी गल्लीतील खोलीत दिलीप कदम यांचा खून झाल्याचे शनिवारी (दि.24) उघड झाले होते. कदम यांची दुसरी पत्नी नंदाबाई घरातून गायब असल्याने तिच्यावर खुनाचा संशय होता. त्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात नंदाबाई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल, आनंदा वाघ आणि इंदिरानगरचे सहायक निरीक्षक निखिल बोंडे यांच्या पथकांना नंदाबाई औरंगाबादेत असल्याची माहिती मिळाली.

तिला पकडण्यासाठी पोलिस पथक औरंगाबादला दाखल झाले. पण, तेथून नंदाबाई येवल्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक पोपट कारवाळ यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा दोनचे पथक येवल्यात पोहोचले. अंमलदार वैशाली घरटे यांच्या मदतीने येवल्यात सापळा रचून नंदाबाईला ताब्यात घेतले. चौकशीत नंदाबाईने खुनाचा गुन्हा कबूल केला असून, तिला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे नंदाबाईने पती दिलीपचा खून केला व त्यानंतर दिवसभर ती घरातच थांबली. यानंतर शनिवारी पहाटे ती मैत्रिणीकडे येवल्याला गेल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button