नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, थेट पंतप्रधानांकडे मागणी | पुढारी

नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, थेट पंतप्रधानांकडे मागणी

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकनगरीला विशेष धार्मिक महत्त्व असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत वाराणसी, प्रयागच्या धर्तीवर संस्कृत विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नाशिकसह देशभरातील साधू-महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

साधू-महंतांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकसह त्र्यंबकेश्वरला धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 14 वर्षांच्या वनवास काळात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटीसह नाशिकमध्ये अनेक ठिकाणी वास्तव्य केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंग स्वरूपात ब—ह्मा-विष्णू-महेश यांचा अधिवास आहे. तसेच संत निवृत्तिनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे या भूमीला विशेष महत्त्व आहे. मात्र असे असतानाही नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये संस्कृत विद्यापीठ नाही, ही खेदाची बाब आहे. देशात उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार व नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. यापैकी नाशिक वगळता तिन्ही ठिकाणी संस्कृत विश्वविद्यालये आहेत. त्यामुळे नाशिकमध्येही संस्कृत विश्वविद्यालय उभारण्याची गरज आहे. खासदार साक्षी महाराज यांच्यामार्फत देखील या आधी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती नाशिकमधील महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी दिली आहे.

तिन्ही कुंभनगरीतील संस्कृत विद्यापीठे…

उज्जैन : मध्य प्रदेशमधील कुंभनगरी उज्जैनमध्ये 15 ऑगस्ट 2008 मध्ये महर्षी पाणिनी संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. 17 ऑगस्ट 2008 रोजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील इलाहाबाद विद्यापीठात सुमारे 150 वर्षांपूर्वी सन 1872 मध्ये संस्कृत विभागाची स्थापना करण्यात आली आहे. प्रा. आदित्यराम भट्टाचार्य यांनी या विभागाचे पहिले विभागप्रमुखपद सांभाळले आहे.

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 21 एप्रिल 2005 मध्ये उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. येथे संस्कृतला द्वितीय राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

ज्याप्रमाणे कुंभनगरी उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये संस्कृत विश्वविद्यालयांची निर्मिती झालेली आहे, त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभनगरी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्येही संस्कृत विश्वविद्यालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन साधू-महंतांची मागणी पूर्ण करावी.
– महंत हर्षदभारती महाराज, श्री पंच दशनाम जुना आखाडा, त्र्यंबकेश्वर

संस्कृत भाषा आणि भारतीय प्राचीन संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धनासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संस्कृत विश्वविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. आजही अनेक समाज संस्कृतच्या वेद, पुराण, उपनिषद, मीमांसा, व्याकरण आदी धर्मग्रंथ या धार्मिक साहित्यापासून व भारतीय संस्कृतीच्या ज्ञानापासून वंचित आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर कुंभनगरी नाशिकमध्ये संस्कृत विश्वविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा.
– महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, नाशिक

हेही वाचा :

Back to top button