नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
सध्या नाशिकरोडहून देवळाली कॅम्प, भगूरसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील काही गावांना जोडणार्या लॅम रोडसह आठही वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली असून, या रस्त्यांची त्वरित डागडुजी करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन एमईएस लष्करी विभागाच्या हद्दीमुळे रस्ता तयार करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तसेच, सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना मोठी कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
"लॅम रोडसह कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन हद्दीतील आठही वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांची डागडुजी न केल्यास संतप्त नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत." – अरुण जाधव, संचालक, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक.
"पुढील आठवड्यात रेणुकामाता मंदिर येथे नवरात्रोत्सवात दहा दिवस यात्रा भरत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे." – काकासाहेब देशमुख, माजी उपाध्यक्ष, नगर परिषद, भगूर.