जागतिक अल्झायमर रोग निवारण दिन : स्मृतिभ्रंश रुग्णांची ‘अशी’ घ्या काळजी

जागतिक अल्झायमर रोग निवारण दिन : स्मृतिभ्रंश रुग्णांची ‘अशी’ घ्या काळजी

आज जागतिक अल्झायमर रोग निवारण दिन. त्यानिमित्त..

कल्पना करा की, तुम्ही एका अनोळखी रस्त्यावरून चालत आहात. कुठे जायचं आहे, हे तुम्हाला आठवत नाही. आजूबाजूचे लोक तुम्हाला ओळखतात; पण ती माणसे कोण आहेत हे तुम्हाला कळत नाहीय. घराचा पत्ता तुम्हाला आठवत नाहीय. कुणाचाही फोन नंबर तुम्हाला पाठ नाही. तुम्ही गोंधळून गेला आहात. आजूबाजूचे लोक तुम्हाला तुमची माहिती विचारत आहेत; पण तुम्हाला तुमचे नावसुद्धा आठवत नाही. नेमकी अशीच परिस्थिती असते अल्झायमरच्या रुग्णांची. अल्झायमर हा डिमेन्शियाचाच एक प्रकार आणि रोखता न येऊ शकणारा एक आजार. 1906 साली डॉ. अ‍ॅलॉईस अल्झायमर यांना एका महिलेचा असाधारण अशा मानसिक आजाराने मृत्यू झाल्याचे आढळून आले. मेंदूतील प्लाक्स ऊतींचे आकुंचन होऊन ती आजारी पडली आणि हा आजार पुढे वाढत जाऊन तिचा मृत्यू झाला, असे निष्कर्ष त्यांनी काढले. त्यांच्या या संशोधनानंतर या आजाराला त्यांचेच नाव दिले अल्झायमर. या आजाराची सुरुवात साधारणपणे वयाच्या साठ वर्षांनंतर होते. अनुवंशाने हा आजार झाला असेल तर काही वेळा वयाच्या 35 ते 40 व्या वर्षीसुद्धा या आजाराची लक्षणे दिसू लागतात. अनुवंश, जीवनशैली, पर्यावरणातील काही बाह्य घटक किंवा मेंदूतील काही सदोष प्रथिनांची वाढही या आजाराला कारणीभूत ठरते. मेंदूमध्ये शरीराच्या क्रियांना नियंत्रित करणारे, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेणारे वेगवेगळे कप्पे असतात. स्मृतींच्या असंख्य जाळ्यांनी ते एकमेकांना जोडले गेलेले असतात. मेंदूमध्ये काही घातक रसायनांचे प्रमाण वाढत जाते आणि त्यातल्या काही कप्प्यांना इजा पोहोचते. मग मेंदूचा काही भाग आक्रसतो आणि मेंदूचा आकार छोटा व्हायला लागतो आणि रुग्ण छोट्या-छोट्या गोष्टी विसरून जायला लागतो.

अल्झायमरचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात स्मरणशक्तीच्या समस्या जाणवण्यापूर्वीच जवळजवळ पाच ते दहा वर्षांपूर्वीच मेंदूतील काही स्मृतींचा र्‍हास व्हायला सुरुवात झालेली असते. या टप्प्यात किल्ली, मोबाईल वारंवार विसरणे, हरवणे, एकच प्रश्न सतत विचारणे, निरोप विसरणे अशी लक्षणे दिसतात. ही अल्झायमरची सुरुवात असू शकते. पुढच्या तीन ते चार वर्षांत अल्झायमरचे पुढचे टप्पे गाठले जातात; पण पहिल्या टप्प्यात उपचार मिळाले तर बरीच वर्षे रुग्ण पहिल्या टप्प्यावरच राहू शकतो. दुसर्‍या टप्प्यामध्ये व्यक्ती काही लोकांचे चेहरे, नावे, पत्ते, फोन नंबर्स विसरते. नव्याने काही शिकण्याची क्षमता गमावून बसते. क्रमाने करायची कामे करायला अडचणी येतात. निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी व्हायला लागते. तिसर्‍या टप्प्यात व्यक्ती आपल्या मुलांनाही ओळखेनाशी होते. रुग्ण तोंडात अन्नाचा घास चावायलाही विसरतो. स्वच्छतेच्या सवयी, अंघोळ करणे, कपडे घालता येत नाही. मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण राहात नाही. उंची, खोली, आकार, वस्तुमान याचे भान राहात नाही आणि रुग्ण पूर्णपणे परावलंबी जीवन जगू लागतो. अल्झायमरचे निदान वागण्यातले, व्यक्तिमत्त्वातले बदल, मेडिकल हिस्ट्री, लघवी, रक्त त्याचबरोबर स्पायनल फ्लडच्या चाचण्या, ब्रेन स्कॅन यांच्याद्वारे केले जाते. अल्झायमर पूर्ण बरा होण्यासाठी उपचार उपलब्ध नाहीत; पण डिमेन्शिया नियंत्रित करता येतो.

अल्झायमरच्या रुग्णाला पहिल्या-दुसर्‍या टप्प्यात छोट्या-छोट्या गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात. अशावेळी गरजेचा असतो तो कुटुंबीयांचा संयम. अशा रुग्णांकडून वस्तू हरवतात, निरोप विसरतात, यामुळे कुटुंबीयांची चिडचिड होते. आजाराच्या तिसर्‍या टप्प्यातील रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत एकटे ठेवणे शक्य नसते. या रुग्णांचा कुटुंबीयांना त्रास होतो; पण विसरभोळेपणाशिवाय या रुग्णांना फारशा शारीरिक व्याधी नसतात. त्यामुळे पहिल्या-दुसर्‍या टप्प्यातील आणि काही वेळा तिसर्‍या टप्प्यातील रुग्णांना छोट्या-छोट्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घेणे, घरातील छोट्या कामांमध्ये, छंदांमध्ये गुंतवणे, संगीत, योगा, नृत्य, छोटे व्यायाम प्रकार यामध्ये त्यांचा वेळ जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अल्झायमरच्या रुग्णांना काही ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीजमध्येसुद्धा सहभागी करून घेता येते. या रुग्णांसाठी डे केअर सेंटर उपलब्ध असतात. ज्येष्ठ नातेवाईकांचा शेवट सुखाचा व्हावा यासाठी आपण त्यांना आधार देणे गरजेचे आहे.

– डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news