नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त | पुढारी

नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून अजूनही गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. दरवर्षी महापौर तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते पूजन होत असते. परंतु, यावेळी प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्तांकडूनच विधिवत पूजन केले जाणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरणासह काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरल्यानंतर दरवर्षी महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची प्रथा आहे. दरवर्षी धरण 70 टक्के भरल्यानंतर मनपाकडून जलपूजन केले जाते. यंदा मात्र धरण क्षेत्रात गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीत विसर्ग केला जात आहे. सध्या गंगापूर धरणात 99 टक्के इतका जलसाठा आहे. तसेच ऑगस्ट महिन्यातच धरण 90 टक्के भरले होते. त्यामुळे धरणाचे पूजन होणे अपेक्षित होते. मात्र, मनपात प्रशासकीय राजवट सुरू असल्याने प्रशासनाला धरणाच्या पूजनाचाच विसर पडला की काय, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेमुळे प्रशासनाला जाग आली आणि पाणीपुरवठा विभागाने गंगापूर धरण जलपूजनाची तयारी सुरू केली. त्यानुसार सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते विधिवत जलपूजन केले जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button