

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनी कुठे आणि कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचा सर्व्हे नंबर काय आहे, यांची माहिती ठेवण्यासाठी सातबारा उतारा बाळगण्याची गरज नाही. केवळ जमिनींचा अकरा आकडी नंबर (भू -आधार) पाठ करून ठेवला, अथवा मोबाईलमध्ये फीड करून ठेवला, तरी त्यांची माहिती लगेच मिळणार आहे. कारण, राज्यातील जमिनींना भू-आधार (यूएलपीएन आयडी) देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यापासून त्यांची अंमलबजावणी राज्यात होणार आहे.
राज्यातील अडीच कोटी सातबारा उतारा आणि सत्तर लाख प्रॉपर्टी कार्ड यांना भू-आधार (यूएलपीएन आयडी) क्रमांक देण्याचे काम भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात सातबारा उतार्यावर क्यूआर कोड आणि यूएलपीएन आयडी क्रमांक टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात सातबारा उतारा काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनींचा हा भू-आधार क्रमांक मिळणार आहे. त्यासाठी पूर्ण नव्या स्वरूपात सातबारा उतारे तयार करण्यात आले आहेत.
शहरातील व ग्रामीण भागातील जमिनींना भू-आधार नंबर देण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राज्य सरकारच्या भूमि अभिलेख विभागाने राज्यातील 2 कोटी 52 लाख सातबारा उतारे आणि 70 प्रॉपर्टी कार्ड यांना हा भू- आधार क्रमांक देण्याचे काम मध्यंतरी हाती घेतले होते. आतापर्यंतच्या सर्व सातबारा व प्रॉपर्टी कार्ड यांना हा भू-आधार क्रमांक देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तर यापुढे नवीन सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्यानंतर त्याला हा नंबर देण्याची तयारी सुरू आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांच्या उजव्या कोपर्यात हा भू-आधार क्रमांक दिला जाणार आहे. तेथेच क्यूआर क्रमांकसुध्दा दिला जाणार आहे. त्याच्याखाली हा अकरा अंकी भू-आधार क्रमांक दिला जाणार आहे. हा नंबर आणि क्यूआर कोडचा वापर करून कोणताही सातबारा अथवा प्रॉपर्टी कार्डची सत्यता पडताळून पाहता येणार आहे.