नात्यातील गुंफण करावी | पुढारी

नात्यातील गुंफण करावी

नाशिक : चंद्रमणी पटाईत

सध्याची लाइफस्टाइल पाहता, प्रत्येकजण आपल्या एका वेगळ्याच धुंदीत असल्याचं चित्र आपल्याला अवतीभोवती नजर टाकल्यास दिसून येतं. ज्याला-त्याला आपला संसार, आपला स्वार्थ, आपलं कुटुंब, आपला परिवार आणि आपलं भौतिक सुख पदरी पाडून घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अनेकदा या सुखाच्या शोधात आपली माणसं, मित्र, आप्तेष्टही नकळत किंबहुना कधीकधी मुद्दामही दूर सारली जात आहेत. केवळ स्वत:च्या सुखाच्या हव्यासापोटी इतरांना तुच्छ लेखण्याची मानसिकता रुजत आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीजवळ जर पैसा नसेल, रोजगार नसेल किंवा नियतीने त्याला या सार्‍या भौतिक सुखापासून वंचित ठेवलं असेल, तर त्या व्यक्तीला आपण दूर सारावं का? त्याच्या प्रयत्नांना भलेही आत्ता यश आलेलं नसेल मग तो कायमस्वरूपी अपयशी असल्याचा शिक्का आपण त्याच्यावर मारणार का? असे ना-ना प्रश्न पडणे साहजिकच आहे. नाही का?

मित्रहो, हा सारा शब्दप्रपंच करण्याचा अट्टाहास आज यासाठीच करावा लागत आहे, कारण नुकताच एक प्रसंग पाहण्यात नव्हे, अनुभवास आला. तो असा, एक मित्र भेटला आणि त्याने त्याच्या मनातल्या भावना, त्याच्या आयुष्यात आलेलं दु:ख त्याने व्यक्त केलं. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही, मिळेल ते काम करून उदरनिर्वाह त्याने केला. स्वाभिमानी बाणा असल्याने अनेकदा नोकरीही सोडावी लागली. त्यातून स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा निर्णय त्याने घेतला. छोटासा व्यवसाय पत्नीच्या साथीने उभारलाही. मात्र, या सर्व व्यापात त्याच्या खडतर मार्गात त्याला आवश्यक होती, ती कुटुंबीयांची खंबीर साथ. ती दुर्दैवाने त्याला मिळाली नाही. उलट कुटुंबीयांनीही त्याला अपयशी ठरवले. तू काहीच करू शकत नाही, अशा शब्दांत वेळोवेळी अवहेलना केली. शेवटी आपलं कुणीही नाही, अशी भावना त्याच्या मनात पक्की रुजली. किमान मानसिक आधारसुद्धा कुणी देला नाही, त्यामुळे बायको, मुलगा यांना सोबत घेऊन त्याने कुटुंबीयांना जय महाराष्ट्र केला. दरम्यान, विंचवाप्रमाणे बिर्‍हाड पाठीवर घेऊन निघालेल्या या तरुणाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शहर गाठलं. त्या शहरात कुणीही ओळखीचं नसताना त्याने पुन्हा छोटीशी नोकरी मिळवली, हळूहळू पुन्हा स्वत:चा व्यवसाय थाटला. आपल्या सुखाच्या वाटेकडे मार्गक्रमण केलं. परंतु या सार्‍या धबडग्यात कुटुंब, भाऊ, मायबाप यांनी आपल्याला दूर सारलं, अनेक मित्रांनी आपल्याकडे पाठ फिरवली, याची खंत मात्र त्याच्या मनातून काही जाईना. त्याला जुन्या एका मित्राची त्याला आठवण झाली, ते दोघं भेटले. दोन्ही मित्रांचा परिवार एकत्र आला. ते आपली सुख-दु:खं वाटून घेतात. एकमेकांची भविष्यातील गणितं मांडतात. मन मोकळं करतात. नव्या ऊर्जेने, नव्या दमाने मोठ्ठं होण्याचं स्वप्न घेऊन एकमेकांना निरोप देतात.

तर, हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे, उचित नातेसंबंध माणसाचं जीवन सुसह्य करतात, असं म्हटलं जातं. संबंधांतूनच नाती निर्माण होतात. त्याला पर्याय नसतो. म्हणून ती तोडायची नसतात, तर जोडायची असतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ न देता, त्यात गोडवा कसा आणता येईल, याचा विचार करावा. नात्याचे पदर नाजूक असतात ते हळुवारपणेच हाताळले पाहिजेत. नात्यांची वीण घट्ट असली पाहिजे. ती कधीच सैल होता कामा नये, त्यासाठी कुणीही कधीही कुणालाही कमी लेखू नये, त्यांना नाराज करू नये, नाती-गोती, सगेसोयरे, पै-पाहुणे यांचं सतत भान ठेवणं गरजेचं आहे, असं वाटतं. आपसातील भांडणतंटे, वाद हे निरर्थक असतात, ते क्षणिक असतात. माणुसकी हीच श्वाश्वत आहे. माणसाने एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे, माणसं जपली पाहिजेत. आपल्या जगण्याला नात्यांचा मोठा आधार असतो. संकटाच्या काळात कळतं की, त्यांची साथ किती मोलाची असते, याचं भान असावं. नाती केवळ रक्ताची असतात असं नाही, तर मानलेली नातीही तितकीच महत्त्वाची असतात. स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे. त्यामुळे उपरोक्त प्रसंग जरी उदाहरणादाखल असला, तरी असे अनुभव आपण सर्वांच्या आसपास पाहावयास मिळतात. त्यामुळे प्रत्येकाने अशा घटनांमधून मार्ग काढून सर्व मिळून-मिसळून कसे एकोप्याने राहतील, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

‘नात्यांची गुंफण करावी प्रेमदार,
जपावी ती ऊबदार.
झालाच कधी गुंता तर… सोडवावा तो हळुवार.
नात्यांची गुंफण टिकून ठेवणं
म्हणजे संस्कार टिकवणं-वाढवणं
त्यात नसतो हिशोब पैशांचा
तिथे असतो वर्षाव फक्त
निःस्वार्थ प्रेमाचा, मायेचा.
एकमेकांना समजून घेऊन
कायम जपण्याचा.
नात्यांची गुंफण असावी तिला नसावे,
गैरसमज आणि संशयाचे कोंदण
त्याला असावे अतुट विश्वासाचे बंधन.
नात्यांची गुंफण…
म्हणजे प्रत्येकाला जन्मताच
लाभलेलं सुंदर आंदण.’
या एका कवीच्या काव्यपंक्ती नेहमी स्मरणात ठेवाव्यात आणि जगणं शिकावं, माणसं जोडावीत, नातं टिकवावं इतकंच.

हेही वाचा:

Back to top button