क्रीडा – महिला क्रिकेटला ग्लॅमर | पुढारी

क्रीडा - महिला क्रिकेटला ग्लॅमर

क्रीडा – महिला क्रिकेटला ग्लॅमर (निमिष वा. पाटगावकर) 
बीसीसीआयने 2023 साली महिला आयपीएल आयोजित करण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला यात सहा संघ असतील. भारतीय महिला संघांची गेल्या काही वर्षांतील उत्तम कामगिरी महिला आयपीएलच्या प्रसिद्धीला नक्‍कीच मदत करेल.आयपीएलमुळे महिला युवा खेळाडूंना एक नवे हक्‍काचे व्यासपीठ मिळेल.

आज 2022 च्या आयपीएलचे सूप वाजेल आणि गेले दोन महिने चाललेला भारतीय क्रिकेटधील प्रचंड आर्थिक उलाढालीचा आयपीएलचा अजून एक हंगाम संपेल. आयपीएल हा बीसीसीआयच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तेव्हा या वर्षीची आयपीएल निर्विघ्नपणे पार पडली म्हणून खेळाडूंपासून मालकांपर्यंत सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला असेल. यंदाच्या आयपीएलदरम्यान बीसीसीआयने अजून एक स्पर्धा खेळवली, ती म्हणजे टी-ट्वेन्टी वुमन्स चॅलेंज. महिलांचे तीन संघ या स्पर्धेत उतरले. ही स्पर्धा म्हणजे बीसीसीआयने पुढच्या वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धा चालू करणार आहे, त्याचा ट्रेलर होता. बीसीसीआयने 2023 साली महिला आयपीएल आयोजित करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. सुरुवातीला यात सहा संघ असतील आणि पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच ते विविध फ्रँचायझींचे असतील. प्रेक्षकांचा याला किती प्रतिसाद असेल, हे आपल्याला यथावकाश कळेलच; पण भारतीय महिला संघांची गेल्या काही वर्षांतील उत्तम कामगिरी या महिला आयपीएलच्या प्रसिद्धीला नक्‍कीच मदत करेल. ही महिला आयपीएल पुरुषांच्या आयपीएलच्या धर्तीवरच खेळवली जाणार असल्याने बीसीसीआयच्या अर्थव्यवस्थेच्या कण्याला अजून पोषक द्रव्ये मिळतीलच; पण भारतीय महिला क्रिकेटच्या द‍ृष्टीने ही एक पर्वणी असेल.

जागतिक पटलावर महिला क्रिकेट अस्तित्वात आले, ते 1934 सालीच. पण भारतात महिला क्रिकेटचा उदय झाला, तो 1973 साली, जेव्हा भारतीय महिला संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला. 1978 साली भारतीय महिला क्रिकेटने विश्‍वचषकाचे आयोजन करत एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. भारत जरी चार देशांच्या महिला संघातला विश्‍वचषकाचा यजमान होता, तरी महिला क्रिकेट लोकप्रिय करण्याला त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्थात, 1983 पर्यंत भारतीय पुरुष संघाचे एकदिवसीय क्रिकेटही विशेष दखलपात्र नव्हते, तर महिला क्रिकेट कुठून असणार? किंबहुना महिला क्रिकेट हा एक निव्वळ कुतूहलाचा विषय होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तेव्हा त्यात व्यावसायिकता अपेक्षितच नव्हती. गेल्या दशकात मात्र महिला क्रिकेटला सर्व क्रिकेट जग गंभीरतेने घ्यायला लागले आणि भारतापुरते बोलायचे, तर आपल्या प्रगतीचा आलेख उंचावतच गेला. विश्‍वचषकात आपण 2005 ला ऑस्ट्रेलियायाकडून आणि 2017 ला इंग्लंडकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारला. याव्यतिरिक्‍त तीनदा उपांत्य फेरीपर्यंत मजल आणि टी-ट्वेन्टी विश्‍वचषकात 2020 ला उपविजेते आणि तीन वेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल, अशी उल्लेखनीय कामगिरी आपल्या महिलांनी केली. एकदिवसीय असो व टी-ट्वेन्टी असो. विश्‍वविजेते बनण्याच्या दारावर आपण धडका मारल्या, पण ते उघडले नाही. यातला 2017 च्या विश्‍वचषकातला अंतिम सामन्यातील इंग्लंडविरुद्धचा 9 धावांनी झालेला पराभव हा जास्तच चुटपुट लावणारा होता. या पराभवाचे आणि यानंतरही अनेक मोक्याच्या सामन्यातील आपल्या महिला संघाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे व्यावसायिकता, तंदुरुस्ती आणि मोठ्या सामन्यातील दडपणाखाली खेळण्याचा अभाव. या महिला आयपीएलमुळे या त्रुटी दूर करायला नक्‍कीच मदत होईल.

आयपीएल हा जरी वारेमाप पैशाचा खेळ असला, तरी जगातील उत्तम खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळायची एक उत्तम संधी आहे. पुरुष असो व महिला, कुठचाही क्रिकेटपटू या स्तरावर पोहोचायला आपले सर्व आयुष्य पणाला लावून आलेला असतो, तेव्हा क्रिकेट खेळायच्या विविध माध्यमातून त्याने वैध मार्गाने पैसे कमावले तर काहीच गैर नाही. महिला क्रिकेटपटूंच्या आयुष्यात तर वैवाहिक आयुष्य, मातृत्व इत्यादी घटकांमुळे त्यांच्या क्रिकेट खेळण्यावर अजून मर्यादा येतात. त्यामुळे या आयपीएलने त्यांना उत्तम पैसे मिळाले तर चांगलेच आहे. बीसीसीआयच्या महिला क्रिकेटच्या करारबद्ध श्रेणीत ‘अ’ श्रेणीच्या खेळाडूंना 50 लाख, ‘ब’ श्रेणीच्या खेळाडूंना 30 लाख, तर ‘क’ श्रेणीच्या खेळाडूंना 20 लाख रुपये वार्षिक मानधन आहे. पुरुषांच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. तेव्हा आयपीएलच्या माध्यमातून महिला क्रिकेटमध्येही पैशाचा शिरकाव होईल. बाकी कोणतीही सोंगं आणता येतात, पण पैशाचे नाही. तेव्हा, महिला क्रिकेटसाठी ही ‘संजीवनी’ ठरेल.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा आजचा विचार केला, तर अनुभवी झुलन गोस्वामी, मिथाली राज या निवृत्तीकडे झुकल्या आहेत. आज या दोघी कराराच्या ‘अ’ श्रेणीतही नाहीत. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव या तिघीच कराराच्या ‘अ’ श्रेणीत आहेत. भारतीय संघ या तिघींच्याच कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांच्या जोडीला आहेत त्या दीप्‍ती शर्मा, राजेश्‍वरी गायकवाड, शफाली वर्मा, पूनम राऊत, शिखा पांडे आणि तानिया भाटियासारख्या खेळाडू. यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे; पण त्याला जगातील उत्तमोत्तम खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक क्रिकेट खेळायची जास्तीत जास्त संधी मिळाली, तर त्यांचा खेळ अजून उंचावेल. आयपीएलमुळे ही संधी त्यांना मिळणार आहे. जसं, पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अनेक होतकरू खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंबरोबर एकत्र खेळून खूप शिकता आले, तोच फायदा महिलांना होईल. पुस्तकी प्रशिक्षणापेक्षा मैदानावरचे सामना खेळून मिळणारे प्रशिक्षण केव्हाही चांगले.

या आयपीएलमुळे अजून एक फायदा होणार आहे, तो म्हणजे देशाच्या कानाकोपर्‍यात खेळत असलेल्या महिला युवा खेळाडूंना एक नवे हक्‍काचे व्यासपीठ मिळेल. आजच्या घडीला ‘विभागीय संघ’ आणि ‘भारतीय संघ’ हेच मर्यादित पर्याय असताना, अचानक सहा नवे पर्याय या संघामार्फत तयार होणार आहेत. याचा अप्रत्यक्ष फायदा होईल, तो भारतीय महिला संघाची बेंचस्ट्रेंथ वाढण्यात. भारतीय पुरुष संघाकडे आज जवळपास तीन संघ एकावेळी उभे करता येतील इतके गुणवान खेळाडू उपलब्ध आहेत. कुणी खेळाडू जायबंदी झाला अथवा उपलब्ध नसला, तर तितक्याच गुणवत्तेचा बदली खेळाडू आज सहज उपलब्ध आहे. महिला क्रिकेटच्या आयपीएलमुळे असेच अनेक गुणवान खेळाडू आपल्याला मिळणार आहेत.

या सर्व झाल्या आयपीएलच्या चांगल्या बाजू. पण आयपीएल ही विविध कारणांनी, विविध आरोपांनी काळवंडलेलीही आहे. स्पॉटफिक्सिंग, मॅचफिस्किंग, भ्रष्टाचार आदी कारणांनी जरी आयपीएल यापूर्वी ग्रासली असली तरी प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे कोरोनासारख्या आपत्तीलाही न जुमानता आयपीएलमध्ये कधी खंड पडला नाही. महिला आयपीएल या संभाव्य गैरप्रकारापासून दूर ठेवणे, हे बीसीसीआयचे आद्य कर्तव्य असेल. पुरुषांच्या आयपीएलवर अजून एक प्रमुख आरोप केला जातो, तो म्हणजे खेळाडू दोन महिने खेळून इतके दमतात किंवा दुखापतग्रस्त होतात की, भारतीय संघासाठी पुढचा काही काळ अनुपलब्ध असतात. सुदैवाने महिला क्रिकेटचा कार्यक्रम इतका व्यस्त नसल्याने अतिरिक्‍त दमवणुकीचा प्रश्‍न इथे असणार नाही.

बीसीसीआयने नुसती महिला आयपीएलची घोषणा केल्यावर काही फ्रँचायझींनी संघ खरेदी करण्यात उत्सुकता दाखवल्याचे कळते. बीसीसीआयने सध्याचे 2018-23 प्रसारणाचे हक्‍क स्टार टीव्हीला 16348 कोटीला विकले आहेत. यंदाच्या दोन नव्या संघामुळे आणि महिला आयपीएलमुळे जेव्हा बीसीसीआय 2023-28 या पाच वर्षांकरिता साधारणत: 40000 कोटी इतका महसूल प्रसारण हक्‍कातून मिळवायची अपेक्षा ठेवून असेल. ऑस्ट्रेलियाने महिला बिग बॅशलीग, इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने महिलांसाठी 100 चेंडूंची स्पर्धा या अगोदरच चालू केल्या आहेत. 2021 च्या बिग बॅश महिला लीगमध्ये आठ संघ सहभागी होते. पुरुषांच्या क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे तर पैसे, ग्लॅमर आणि खेळाचा दर्जा या तिन्ही स्तरात आयपीएलने इंग्लिश कौंटी, बिग बॅश, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि अशा अनेक लीगना केव्हाच मागे टाकले आहे. बीसीसीआय महिला आयपीएल हे एका उत्तम चालणार्‍या धंद्याचे अतिरिक्‍त अंग म्हणून बघत असेल, यात शंका नाही. तेव्हा या धंद्यात स्पर्धकांना मागे टाकून पुरुषांच्या आयपीएलसारखे आर्थिक नफ्याचे गणित जमवायचा उद्देश बीसीसीआयचा असेल, यात शंका नाही. धंदा कुणाचाही होवो; पण आज आपल्या आणि एकूणच ‘जागतिक महिला क्रिकेट’ला एक हक्‍काचे व्यासपीठ, पैसे आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळायची संधी मिळत असेल, तर ‘महिला आयपीएल’चे स्वागत करायलाच हवे!

Back to top button