नाशिक : आंतरराष्ट्रीय वाइन चॅलेंज स्पर्धेमध्ये सुला विनियार्डला सुवर्णपदक | पुढारी

नाशिक : आंतरराष्ट्रीय वाइन चॅलेंज स्पर्धेमध्ये सुला विनियार्डला सुवर्णपदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय वाइन चॅलेंज 2022 या स्पर्धेमध्ये नाशिक येथील सुला विनियार्ड या भारतातील सर्वांत मोठ्या वाइन उत्पादक कंपनीने सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय वाइनरीने या आंतरराष्ट्रीय मंचावर प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय वाइन उद्योगासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.

सुला ब्रुट ट्रॉपिकाल या लोकप्रिय आणि आकर्षक स्पार्कलिंग रोझ वाइनने 95 गुणांसह हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय, सुला लेट हार्वेस्ट शेनिन ब्लॉ या वाइनने 87 गुणांसह कांस्यपदकदेखील पटकावले आहे. इंटरनॅशनल वाइन चॅलेंज हा 1984 पासून दरवर्षी आयोजित केला जाणारा सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वाइन पुरस्कारांपैकी एक आहे. या वर्षी 18 हजारांहून अधिक वाइनच्या प्रवेशिका आल्या होत्या आणि त्या सर्वांमधून सुवर्णपदक प्राप्त करणे हा एक दुर्मीळ सन्मान आहे. आंतरराष्ट्रीय सुला विनियार्डने वाइनमेकिंग आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण टप्पे गाठून भारतीय वाइन उद्योगात स्वतःला अग्रेसर म्हणून वारंवार सिद्ध केले आहे. सुला ब्रॅण्ड हा भारतीय वाइन ग्राहकांची प्रथम पसंती नेहमीच ठरला आणि इंटरनॅशनल वाइन चॅलेंजमध्ये मिळालेले सुवर्णपदक हे भारतातील अभिमानाने बनवल्या जाणार्‍या आणि सतत सुधारणा होत असलेल्या वाइनच्या ‘जागतिक दर्जा’चा जणू दाखलाच ठरला आहे. सुला विनियार्डचे संस्थापक आणि सीईओ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय वाइन चॅलेंज पदक हे जागतिक वाइन उद्योगासाठी सर्वांत प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे. आमची ब्रुट ट्रॉपिकल ही सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय वाइन आणि सुला विनियार्ड ही पहिली वाइनरी असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button