नाशिक : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे ‘एप्रिल फूल’ आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या महागाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्र्यंबक नाका येथील पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यास आलेल्या वाहनचालकांना पेट्रोल 70 रु., डिझेल 60 रु., तर गॅस सिलिंडर 450 रुपये झाल्याचे बॅनर लावत साखर वाटप करून पेट्रोल दरवाढीच्या विरोधात बुधवारी (दि.30) अभिनव असे एप्रिल फूल आंदोलन केले.

केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वेळोवेळी विविध करांच्या माध्यमातून केलेल्या भरमसाट दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघाली आहे. केंद्र शासनाने पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलवरील करांत केलेली कपात फसवी ठरली, तर महाराष्ट्र शासनाने करांमध्ये कुठलीही सूट जाहीर केलेली नसून राज्यातील जनता महागाईच्या दुष्टचक्रात भरडली जात आहे.
रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीचे कारण देत तेल कंपन्यांनी मागील आठवड्यात तब्बल पाच वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाल्याने एक हजारांच्या पलीकडे गेलेल्या गॅस सिलिंडरवर फक्त 40.10 रुपयेच सबसिडी मिळत आहे. दोनशे रुपयांच्या घरात गेलेल्या गोडेतेलामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
दारूवरील अबकारी करात सूट देणारे सरकार पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत मात्र दुजाभाव करून गोरगरीब जनतेच्या जीविताशी खेळत आहे. इंधनाच्या दरात कपात होऊन दिलासा मिळण्यासाठी शासनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्य जनतेस वाटाण्याच्या अक्षता लावणार्या शासनाचा निषेध मनसेतर्फे करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष नितीन माळी, उपाध्यक्ष संतोष कोरडे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, सरचिटणीस निखील सरपोतदार, मिलिंद कांबळे, संघटक संजय देवरे, अमित गांगुर्डे, किरण क्षीरसागर, नवनाथ जाधव, अर्जुन वेताळ, कौशल पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- रत्नागिरी: ना. ठाकरे यांच्या हस्ते चिपळुणात बचाव सामग्रीचे लोकार्पण
- नाशिक : पोलिस आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध शनिवारी पेट्रोल पंप बंद
- रत्नागिरी: पर्ससीन नेट मच्छीमारांचा आज मोर्चा