रत्नागिरी: पर्ससीन नेट मच्छीमारांचा आज मोर्चा | पुढारी

रत्नागिरी: पर्ससीन नेट मच्छीमारांचा आज मोर्चा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: समुद्रातील मत्स्य साठ्यावर होणार्‍या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्ससीन नेट मासेमारीलाच जबाबदार धरून या मासेमारीवर जाचक निर्बंध टाकण्यात आले. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्‍या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणार्‍या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अ‍ॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे, या मागणीसाठी पर्ससीन नेट मच्छिमार, मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पुरक व्यावसायिक गुरूवारी मोठा मोर्चा काढणार आहेत.

मिरकरवाडा जेटी येथून सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. याच मच्छीमारांचे सागरी मासेमारीच्या सुधारित कायद्याविरोधात गेल्या 3 जानेवारीपासून साखळी उपोषणही सुरू आहे.

समुद्रातील मत्स्यसाठ्याचे जतन करण्याच्या नावाखाली मागील अभ्यासगटाच्या निर्देशानुसार पर्ससीन नेट मासेमारी कालावधी, समुद्र क्षेत्र आणि परवाना नूतनीकरण व नवीन परवाना देण्याबाबत निर्बंध टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी जो सुधारित कायदा झाला आहे त्यात पर्ससीन नेट मासेमारीला उद्ध्वस्त करणार्‍या तरतुदी आहेत. याविरुद्ध गेले तीन महिने साखळी उपोषण सुरुच आहे.

पर्ससीन नेट मासेमारीवर वेळोवेळी बंधने टाकण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. आता ज्या अभ्यास समितीच्या निकषानुसार पर्ससीन नेट मासेमारीवर निर्बंध लादले जातात त्या समितीचेच लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून मच्छीमार, नौका मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यावसायिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. नव्याने गठीत झालेल्या समितीने केवळ पर्ससीन नेट मासेमारीला लक्ष्य करू नये. इतरही जाळ्यांद्वारे होणार्‍या मासेमारीचा विचार केला जावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

पर्ससीन नेटमध्ये एकाच प्रकारची मासळी मिळते

पर्ससीन नेट मासेमारीत एकाच प्रकारची मासळी पकडली जाते. परंतु, इतर पाच प्रकारच्या जाळ्यांमध्ये सर्वच प्रकारची मासळी पकडली जाते. मात्र अशा मासेमारीबाबत मत्स्यसाठा जतन आणि पारंपरिक मासेमारीचे हित जोपासण्यात विचारच होत नाही. याकडे पर्ससीन मच्छीमारांच्या मोर्चाने लक्ष्य वेधून घेतले जाणार आहे.

Back to top button