रत्नागिरी: ना. ठाकरे यांच्या हस्ते चिपळुणात बचाव सामग्रीचे लोकार्पण | पुढारी

रत्नागिरी: ना. ठाकरे यांच्या हस्ते चिपळुणात बचाव सामग्रीचे लोकार्पण

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चिपळूण पेठमाप येथे नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पोर्टेबल इन्फ्लाटेबल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या रबर बोट व इतर साधन सामग्रीचा लोकार्पण सोहळा आज झाला.

यावेळी परिवहन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. राजन साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. ठाकरे यांनी चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होणारा पाऊस, पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते.
पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचावकार्य करण्यासाठी रबरी बोट व त्या अनुषंगाने आवश्यक वस्तूंचा उपयोग होणार आहे.

तसेच आपत्ती काळात रात्रीच्या वेळी अडगळीच्या ठिकाणी जनरेटर अथवा मोठ्या बॅटर्‍या उपलब्ध न झाल्याने अडचणी निर्माण होतात. अशावेळी Portable Infltable Emergency Lighting System चा वापर करुन घाट रस्ते, समुद्रकिनारे अशा ठिकाणी शोध व बचावकार्य करण्यास सुलभ होणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या समवेत पेठमाप, चिपळूण येथील वाशिष्ठी नदीच्या काठावर वृक्षरोपण केले.

यावेळी कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनंत मोरे यांनी केले.

Back to top button