

NCP Merger Formula: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संभाव्य युतीच्या चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या गटाचा पुन्हा एकत्र येण्याचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेच्या वाटपाबाबतही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील राजकारणाची संपूर्ण जबाबदारी अजित पवार सांभाळतील, तर केंद्रातील राजकारण आणि पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील कामकाज सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली जाईल, असा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा करू शकतात. याआधीही शरद पवार यांनी सामाजिक कार्यासाठी अधिक वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कुटुंबातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पवार कुटुंबातील वरिष्ठ आणि तरुण पिढीत या संबंधित चर्चा झाली असून, सध्याच्या राजकीय स्पर्धेत पक्ष आणि पवार कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी अजित पवारच सक्षम नेतृत्व देऊ शकतात, यावर एकमत झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
याच चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या भविष्यासंदर्भातही काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील राजकारणात सुप्रिया सुळे अधिक प्रभावी असल्याने, केंद्रातील पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल. राष्ट्रवादीचे लोकसभेत आठ खासदार असल्याने, भविष्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हे राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच युतीच्या हालचालींना वेग आला आहे.
या संभाव्य युतीमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील काही नेते अस्वस्थ आहेत. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास काही नेते तयार नसल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर राष्ट्रवादीची अधिकृत युती झाली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. मात्र, ही युती नेमकी कधी आणि कोणत्या अटींवर होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.