

Manvendra Singh UPSC Success Story: उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातील 24 वर्षांचा मनवेंद्र सिंग याने अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवली आहे. सेरेब्रल पाल्सी हा आजार असतानाही त्याने इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा 2025 मध्ये पहिल्याच प्रयत्नात AIR 112 मिळवून भारतीय अभियांत्रिकी सेवेत (IES) पोस्ट मिळवली आहे.
मनवेंद्र अवघ्या सहा महिन्यांचा असताना त्याला सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान झाले होते. दोन वर्षांचा असताना त्याला मान सरळ धरताही येत नव्हती. हळूहळू शरीराची उजवी बाजू निकामी होत होती. साध्या-साध्या हालचालींसाठीही त्याला खूप प्रयत्न करावे लागत होते.
त्याची आई रेनू सिंग या बुलंदशहरमधील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या सांगतात, “आज UPSC पास करणं मोठी गोष्ट वाटते, पण त्याचा खरा संघर्ष लहानपणापासून सुरू झाला होता. पेन्सिल कशी धरायची, लिहायचं कसं, हे सगळं त्याने हळूहळू शिकून घेतलं.”
लहानपणी मनवेंद्र बोटांमध्ये पेन्सिल धरू शकत नव्हता. तो ती मुठीत पकडून लिहायचा. अनेक वर्षांच्या सरावानंतर त्याने डाव्या हाताने लिहायची सवय लावून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हा आजार आयुष्यभर सोबत राहील. त्याच्या आईने देशभरातील 50 हून अधिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. शेवटी दिल्लीतील एका रुग्णालयात त्याची प्रकृती स्थिर झाली.
वयाच्या 17 व्या वर्षी मनवेंद्रला आणखी एक मोठा धक्का बसला. दीर्घ आजारानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला, पण कालांतराने त्याने स्वतःला सावरलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. शिक्षणात मात्र तो नेहमीच हुशार होता. बारावीनंतर कुटुंबीयांनी सुरक्षित पर्याय म्हणून यूपी टेक्निकल एट्रन्स परीक्षा देण्याचा सल्ला दिला. पण मनवेंद्र ठाम होता, त्याला IIT मध्येच जायचं होतं.
त्याने GATE परीक्षेत AIR 63 मिळवला आणि IIT Patna येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech पूर्ण केलं. पदवीनंतर तो दिल्लीला गेला आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीला लागला. तीन टप्प्यांची ही परीक्षा असते, प्रिलिम्स, मेंस आणि मुलाखत. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ही परिक्षा खूप कठीण असते. तरीही पहिल्याच प्रयत्नात मनवेंद्रने सर्व टप्पे पार केले आणि AIR 112 मिळवून यश मिळवलं.
या यशामुळे त्याची निवड रेल्वे, टेलिकॉम, पॉवरसारख्या केंद्र सरकारच्या तांत्रिक विभागांमध्ये होणार आहे. मनवेंद्रच्या आईसाठी हा फक्त एक निकाल नाही. त्या म्हणतात, “या यशा मागचा प्रवास खूप मोठा आहे. अडचणी असूनही स्वप्नं पूर्ण करणं, हेच त्याचं खरं यश आहे.” मनवेंद्र सिंगची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे.