

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने लढणार, अशी घोषणा झाली असली तरी पहिल्या बैठकीनंतर महायुतीची पुढील प्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे. बैठक होऊन आठवडा उलटला तरीही जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित न झाल्याने शिवसेना (शिंदे) गटात नाराजी वाढली असून, स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिवसेनेने महापालिकेत 34 जागांची मागणी केली असताना, भाजप फक्त 16 जागा देण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. काही खासगी चर्चांमध्ये शिवसेनेला फक्त 9 ते 10 जागा मिळू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोघेही अस्वस्थ झाले आहेत.
भाजपकडून पक्षविस्ताराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. शिवसेनेतील (ठाकरे गट) अनेक माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला असून, शिवसेनेचा प्रभाव असलेल्या प्रभागांतही भाजप स्वतःच्या इच्छुकांना पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. या हालचालींमुळे शहरातील शिवसैनिकांत असंतोष वाढला आहे. पहिल्या बैठकीनंतर महायुतीची संयुक्त बैठक न झाल्याने नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी मांडल्या आहेत. युतीत अधिक जागा मिळाल्या नाहीत, तर स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपची भूमिका अशीच राहणार असेल, तर महायुतीचा फायदा नेमका काय? असा सवालही शिवसेना पदाधिकारी उपस्थित करत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडे (शिंदे गट) तब्बल 500 इच्छुकांचे अर्ज आले होते. सर्व मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 350 इच्छुकांची यादी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी सांगितले, की युतीबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून, जागावाटपाचा फॉर्म्युला आणि अंतिम यादी पक्षनेतृत्वच जाहीर करणार आहे.