नंदुरबारला व्यापाऱ्यांवर छापे ; आस्थापनांची चौकशी सुरू | पुढारी

नंदुरबारला व्यापाऱ्यांवर छापे ; आस्थापनांची चौकशी सुरू

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारला व्यापाऱ्यांवर छापे पडल्‍याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या पथकांनी अचानक नंदुरबार शहरातील काही व्यापाऱ्यांवर छापेमारी करून झाडाझडती घेणे सुरू केले. आयकर विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. परंतु, हे पथक केंद्रातील आहे की राज्य स्तरावरील आहे? याची स्पष्टता अधिकृतपणे अजून झालेली नाही.

नंदुरबारला व्यापाऱ्यांवर छापे पडल्‍याने शहरातील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत.  तीन नामांकित व्यक्तींकडे व त्यांच्या आस्थापनांमध्ये आज बुधवारी (दि. २२) रोजी सकाळी तपासणी सुरू असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांचे पथक अशा तऱ्हेने धडकल्याचे पाहून अनेकांचे धाबे दणाणले आहे. नंदुरबार  कोणा- कोणाची तपासणी केली जाणार, याची माहिती घेण्यासाठी कार्यकर्ते धावाधाव करत होते.

सध्या आयकर विभागाने उत्त रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक असे क्रमाने विविध राज्यात छापेमारी करीत अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. मागील दोन महिन्यात अवैध व्यवहार, बेकायदेशीर खरेदी-विक्री, बनावट कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळे, याच्याशी संबंधित व्यवहार उघड केले जात आहेत. केंद्रीय पथकांनी सुरू ठेवलेल्या या मोहिमेचा देशस्तरावरील काही मोठ्या ग्रुपला तसेच नेत्यांना फटका बसला आहे.

नंदुरबारला व्यापाऱ्यांवर छापे : कागदपत्र नोंदींची व दप्तराची झाडाझडती

अशातच महाराष्ट्रातील दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याकडे या पथकांनी अचानक नजर वळविल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात हे पथक केंद्रातील आहे की राज्य स्तरावरील आहे? याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही. परंतु, कागदपत्र नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी मिळाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button