नाशिक : गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; ७३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
देवळा, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर देवळा पोलिसांनी शुक्रवार (दि.१७) रोजी पकडला. या कारवाईत सुमारे ७२ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, देवळा पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजस्थानातील कोटा येथे तयार झालेल्या राज मसाला गुटखाचे पार्सल घेऊन जाणारा कंटेनर (एच आर -३८ -डब्लू -७२३६) हा मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी देवळा पोलिसांनी कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात ४७ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा सापडला.
यावेळी पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या कंटेनरसह सुमारे ७२ लाख ९० हजारांचा ऐवज तसेच कंटेनर चालक सोहेब खानला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात देवळा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप देवरे, दिनेश तांबोळी यांनी याबाबत तपासणी करून पुढील कारवाई केली. गेल्या काही दिवसांतील गुटख्याविरुध्दची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या करवाईचे सर्व स्तरारून कौतुक होत आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश सावकार, सचिन भामरे आदी करीत आहेत.
हेही वाचा
- जळगाव : ३१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का
- Amit Shah : 'सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतात पण…
- leopard fight : पुण्यात दोन बिबट्यांच्या थरारक झुंझीत एकाचा मृत्यू, स्थानिक शेतकऱ्याने बघितली प्रत्यक्ष झुंज
- Blood Group : भारतात 'या' रक्तगटाचे आहेत सर्वाधिक लोक, जाणून घ्या प्रत्येक रक्तगटाची स्थिती

