पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार विकी कौशल आणि कॅटरीना कैफ ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान हे जोडपे हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. विकी आणि कॅटरीनाने आपले लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील 700 वर्षे जुना 'सिक्स सेन्स फोर्ट बरवारा' हा किल्ला निवडला आहे.
ही जागा 6 ते 11 तारखेपर्यंत लग्नासाठी बुक करण्यात आली आहे. लग्नासाठी येणाऱ्या 120 पाहुण्यांसाठी 45 खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत. विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या लग्नाची गुप्तता पाळण्यात आली आहे. कॅट आणि विकीला हार घालत असताना पाहताना चाहते आतुर झाले आहेत, परंतु लग्नासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने विकी कौशल- कॅटरीना कैफच्या लग्नाचे प्रसारण हक्क 80 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. कॅट आणि विकीने लग्नाआधीच अॅमेझॉन प्राइमला टेलिकास्टचे हक्क विकले होते. लग्न गुप्त ठेवण्यामागेही हेच कारण आहे. यादरम्यान, जोडप्याने त्यांच्या सर्व पाहुण्यांना नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यासाठी देखील आणले आहे.
नॉन-डिस्क्लोजर करारामध्ये सर्व पाहुण्यांना लग्नाची गोपनीयता राखण्याची आणि स्थळावरून कोणतेही फोटो लीक न करण्याची विनंती करण्यात आली आहे. या करारामध्ये असे लिहिले आहे की, 'आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचे मोबाईल फोन आणि कॅमेऱ्याचा वापर करु नका. या दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही कार्यक्रम आणि कार्यक्रमाशी संबंधित फोटो पोस्ट करणे देखील टाळा. या दरम्यान सर्व 120 पाहुण्यांसाठी सिक्रेट कोडही बनवण्यात आला आहे.
विकी कौशल आणि कॅटरीना कैफच्या या 'वेडिंग सीरिज'मध्ये चाहत्यांना त्यांच्या 'वेडिंग' तसेच 'रोका सेरेमनी'पासून 'प्री वेडिंग शूट'पर्यंत सर्व काही पाहायला मिळणार आहे. या 'वेडिंग सीरिज'मध्ये चाहत्यांना 6 ते 11 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सर्व कार्यक्रमही पाहायला मिळणार आहेत. चाहते फेब्रुवारी 2022 मध्ये 'Amazon प्राइम व्हिडिओ'वर विकी आणि कॅटरीनाच्या लग्नाची सिरीज पाहू शकतील. 2019 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी देखील एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाची मालिका डील केली होती.