South Africa Series : द. आफ्रिका दौर्‍यापूर्वी टीम इंडियाला धक्‍का, ‘हे’ खेळाडू जखमी | पुढारी

South Africa Series : द. आफ्रिका दौर्‍यापूर्वी टीम इंडियाला धक्‍का, 'हे' खेळाडू जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : South Africa series : न्‍यूझीलंड विरुद्‍धच्‍या मालिकेमध्‍ये घवघवीत यश मिळाल्‍यानंतर आता दक्षिण आफ्रिकेा दौर्‍यासाठी टीम इंडिया सज्‍ज झाली आहे. या दौर्‍याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. रविंद्र जडेजा, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि इशांत शर्मा गंभीर जखमी झाले असून हे चारही खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. काल द. आफ्रिकेने त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या माहितीनुसार, भारतीय संघाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पण रविंद्र जडेजा, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि इशांत शर्मा हे चार खेळाडू जखमी असल्याने त्यांना विश्रांती देण्यात येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार हे चार खेळाडू तंदुरुस्त नाहीत. मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही रवींद्र जडेजा आणि इशांत खेळले नाहीत. मुंबई कसोटीपूर्वी बीसीसीआयने जडेजाबद्दल सांगितले होते की, ‘कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्याला सूज असल्याचे आढळून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नाही. दुसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी जयंत यादवला संधी मिळाली होती. जयंतने या सामन्यात एकूण पाच विकेट्स घेतल्या.

शुभमन गिललाही दुखापत

टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिललाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणे कठीण असल्याचे समजत आहे. गिलच्या पायाला दुखापत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यापूर्वी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे तो हा दौरा मध्येच सोडून परतला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.

अक्षर पटेलने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ९ विकेट घेतल्या. एजाज पटेल आणि अश्विननंतर सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला. अक्षरने न्यूझीलंडविरुद्धही आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. मुंबई कसोटीत त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. तर दुस-या डावात ४१ धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत हा खेळाडू संघाचा भाग नसेल तर भारतीय संघाला खूप नुकसान होईल.

इशांत संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज

इशांत शर्माने भारतासाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत जर इशांत संघाचा भाग नसेल तर संघाला त्याची नक्कीच उणीव भासेल. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर स्विंग, वेग आणि बाउन्स आहेत. अशा परिस्थितीत इशांत संघासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

जडेजाच्या जागी कोण?

जडेजाची यंदाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. त्याने ७ सामन्यात २४.४५ च्या सरासरीने २६९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या खेळाडूने १६ विकेट्सही घेतल्या आहेत. गेल्या वर्षभरात या खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत या खेळाडूची उणीव भासणार आहे. अक्षर आणि जडेजाच्या जागी शाहबाज नदीम आणि सौरभ कुमारची निवड केली जाऊ शकते. अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. सौरभ कुमार सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

Back to top button