Land Record Office : विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापकाचा मृत्यू - पुढारी

Land Record Office : विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापकाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील (Land Record Office) प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील (वय-५२)  यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून, २३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा रूग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, वरिष्ठांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात (Land Record Office) एम. एस. पदावर काम करत होते. खडका येथून ते दररोज दुचाकीने कार्यालयात ये जा करत होते. सन २०१९ पासून कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे मानसिक दबावाखाली काम करत होते. हा त्रास सहन न झाल्याने संजय पाटील यांनी कामावर असतानाच कार्यालयात विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एरंडोल येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने १ डिसेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी १२. १५ वाजेच्या सुमारास संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संजय पाटील यांनी मृत्यूपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलीसांच्या ताब्यात आहे. त्यामध्ये व्ही. एन. पाटील, व्ही.एल. सोनवणे, आर. व्ही. जाधव आण ठाकूर या चार अधिकाऱ्यांच्या जांचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या घटनेमुळे संजय पाटील यांच्या पत्नी रजनी, मुलगा प्रशांत आणि शालक शांतराम पाटील यांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला. संजय यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांसह नातेवाईकांनी घेतला.

हेही वाचा

Back to top button