राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार | पुढारी

राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा करणाऱ्यांच्या बोलण्यात अहंकार आहे. त्यांची निष्ठा विचारांवर नसून सत्तेवर आहे. त्यामुळेच यापूर्वी थोर पुरुषांच्या अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांसमवेत ते सत्तेत गेले. आमची निष्ठा विचारांबरोबर असल्याने आम्ही पवार साहेबांचा विचार आणि संदेश हा जनतेपर्यंत नेत असल्याची टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात केली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेचा आदर करीत राजीनामा दिला पाहिजे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या सर्वच नेत्यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले तसेच संदीप बेडसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी समाज सुधारकांनी संदर्भात यापूर्वी बेताल वक्तव्य केले. त्यावेळी राष्ट्रवादी मध्ये असणाऱ्या या नेत्यांनी देखील बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर टीका केली. पण आता ते नेते टीका करणाऱ्या सोबत गेले आहे. एकीकडे पवार साहेबांवर निष्ठा असल्याचे सांगायचे, आणि दुसरीकडे सत्तेबरोबर निष्ठा ठेवायची ही बाब जनतेला ठाऊक आहे, असा टोला यावेळी आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

गोवारी समाजाच्या मोर्चा संदर्भात झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यावेळीचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला होता. तर मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्या वेळचे राष्ट्रवादीचे मंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता. हीच पारदर्शकता लक्षात घेऊन मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यावेळी विरोध करणारे हे कोणत्या पक्षाचे होते हे जनतेला ठाऊक आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे केतन तिरोडकर आणि गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात आता राज्य शासनाने केंद्र शासनाकडून विशेष अधिवेशनामध्ये सुधारित कायदा केला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणतेही आरक्षण बाधित होणार नाही, याची काळजी घेतली पाहीजे.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

एकच निवडणूक हा संविधानाच्या विरोधातला प्रकार

या देशात एक देश एक निवडणूक हा प्रकार संविधानाच्या विरोधात आहे. हा देश संघराज्य पद्धतीने चालवला जात असताना तो एकाधिकारशाहीकडे नेण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याची भाषा करत आहे. ते बदलून एकाधिकारशाही त्यांना आणायची आहे. एक निवडणूक या माध्यमातून खर्च कमी होणार नसून तो खर्च वाढणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण आहे. कर्नाटक राज्यात निवडणुकीच्या निकालातून हे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काही विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव लक्षात आल्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घालवला जात असल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button