कोकणात पावसाचे पुनरागमन; ७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट | पुढारी

कोकणात पावसाचे पुनरागमन; ७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट

किशोर सुद

अलिबाग :  गेली सुमारे महिनाभर कमजोर पडलेल्या पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. येत्या सात सप्टेंबरपर्यंत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. सप्टेंबरच्या दोन दिवसात पनवेल, खालापूर आणि कर्जत येथे सर्वात जास्त पाऊस झाला आहे. मात्र यावर्षाच्या मान्सूनना गेल्या तीन महिन्यातील सरासरी गाठता आलेली नाही. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात ९७.६ टक्केच पाऊस झाला आहे. सध्या सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे.

यावर्षी मान्सूनच्या पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्याचा अनुषेश या जुलै महिन्यात भरुन निघण्यास मदत झाली. मात्र पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या एक दोन सरी सोडल्यास ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. या दोन महिन्यातील पावसाचा परिणाम खरिप पिकाच्या हंगामावर झाला.

आधीच उशिराने पाऊस सुरू झाल्याने पेरणी आणि त्यानंतर पिकाच्या लावणीला विलंब झाला. जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लावणीची काम आटोपून घेतली. लावणी झाली मात्र लावलेल्या पिक जोर धरण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. जुलै महिन्यातील साठलेल्या पाण्याने या पिकाला जीवदान देण्याचे काम केले.

आता सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पावसाचे पुनरागन होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गेली दोन दिवसात जिल्ह्यात पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील पावसाची तीन महिन्याची सरासरी कमीच आहे. तीन महिन्यात जिल्ह्यात ९७.६ टक्केच सरासरी पाऊस झाला आहे.

Back to top button