Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती | पुढारी

Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

नांदगाव : सचिन बैरागी

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी, नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात नांदगावकरांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील विहिरी, नदी- नाले कोरडेठाक पडले असून, तालुक्यात १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मागील दोन वर्षांत नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याला ऐन पावाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भविष्यात पावसाची अशीच परस्थिती राहिली तर नांदगावसह तालुक्यातील गावांना यापेक्षा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सध्या तालुक्यातील १२ गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. भविष्यात यात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तालुक्यातील धरणांतदेखील पाणीसाठा जेमतेम शिल्लक आहे. दहेगाव धरणात सध्या मृतसाठा धरून १४ दशलक्ष घनफूट इतका साठा शिल्लक आहे.

टक्केवारीनुसार दहेगाव धरणात २० टक्के साठा आहे. तर मृतसाठा अवघा १० टक्के इतकाच आहे. मागील वर्षी या कालावधीत एकूण ४० दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा या धरणात होता. माणिकपुंज धरणात ८५ दलघफू इतका मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरण परिसरात ११३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी या कालावधीत ४०९.३६ दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. तर ४५५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या सरासरी १५ टक्के मृतपाणी साठा या धरणात आहे. तर नागा साक्या धरणात ११० दलघफू इतका मृतसाठा आहे. या धरण परिसरात चालू वर्षांत ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी या धरणात ३१६ दलघफू इतका पाणीसाठा होता. तर १९९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली होती. सदयस्थितीत मृत पाणीसाठ्याच्या ७०.९६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

टँकर सुरू आसलेली गावे
नवसारी, शास्त्रीनगर, बोयेगाव, खादगाव, धोटाणे (खुर्द), हिसवळ (खुर्द), नागापूर, पांझणदेव, माळेगाव (क), बेजगाव, वंजारवाडी, सटाणे
======================
एकूण टँकर संख्या : 18
● पाणीपुरवठा गावे संख्या 19
● वाडी-वस्ती संख्या : 55
●एकूण टँकर फेऱ्या ( खेपा): 44
======================
● धरणातील शिल्लक साठा
● दहेगाव धरण : १० टक्के
● माणिकपुंज १५ टक्के
● नागा-साक्या ७०.९६ टक्के

हेही वाचा :

Back to top button