पुणे विभागात तीव्र पाणीटंचाई !! ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

पुणे विभागात तीव्र पाणीटंचाई !! ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र होत असून, ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासत आहे. विशेष म्हणजे 31 मे रोजी पुणे विभागात 99 हजार नागरिकांना 54 टँकरने पाणी पुरविले जात होते. मात्र, पावसाळ्यात आजच्या तारखेला तीन लाखांहून अधिक नागरिकांना 155 टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा मान्सून विलंबाने सक्रिय झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली.

त्यानंतर झालेल्या पावसामुळे कृष्णा आणि भीमा खोर्‍यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, दुसरीकडे पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरित पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील 146 गावांतील तब्बल तीन लाख 4 हजार 59 नागरिक आणि सुमारे 90 हजार जनावरे अद्यापही तहानलेलीच असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी आणि चाराटंचाई संदर्भात आढावा बैठक घेतली.

त्यात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर दुसरीकडे 31 मे रोजी पुणे जिल्ह्यातील 49 गावे आणि 214 वाड्यांतील 78 हजार 472 नागरिकांना 37 टँकरद्वारे पाणी पुरवले जात होते, तर आजच्या तारखेत 36 गावे आणि 271 वाड्यातील 98 हजार नागरिकांना 38 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र  होत असून, 31 मे रोजी 16 गावे 50 वाड्यांतील साडेअठरा हजार नागरिक आणि साडेतीन हजार जनावरांना 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, तर आजच्या तारखेत 75 गावे आणि 400 वाड्यांतील एक लाख 14 हजार नागरिक आणि 65 हजार जनावरांना तब्बल 76 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यात आजच्या तारखेला 29 टँकरद्वारे 62 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे, तर 31 मे रोजी सोलापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता. मात्र, आज 10 टँकरद्वारे 11 गावे आणि 90 वाड्यांतील 30 हजार नागरिक आणि 20 हजार जनावरांना पाणी पुरविले जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news