नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना | पुढारी

नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू झाली असून, संसर्ग वाढू नये यासाठी डोळे आलेल्या रुग्णांस क्वारंटाइन करा, रुग्णाची योग्य ती काळजी घ्या अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांना दिल्या आहेत.

डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. डोळे येणे संसर्गजन्स असल्याने खालील उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरू आहे किंवा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात आरोग्यसेवकांच्या मदतीने घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात यावे. या भागात पावसामुळे चिकचिक, घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपायोजना कराव्यात. डोळे आलेल्या रुग्णांमध्ये डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करायला हवा तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज

शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रात योग्य ती दक्षता घेऊन सर्वसामान्य जनतेला आवश्यक आरोग्य शिक्षण देण्यात यावे. डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यामध्ये वैद्यकीय सल्ला घ्यावा, जनजागृती करण्यात यावी. सर्व संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध राहतील याची खातरजमा करावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.

हेही वाचा :

Back to top button