धूमकेतूवरील ज्वालामुखीचा स्फोट! | पुढारी

धूमकेतूवरील ज्वालामुखीचा स्फोट!

वॉशिंग्टन : सूर्याकडे जात असलेल्या एका अनोख्या धूमकेतूवरील ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. हा धूमकेतू अत्याधिक थंड मॅग्मा अंतराळात सोडत आहे. या स्फोटानंतर धूमकेतू जणू काही एखाद्या छोट्या तार्‍यासारखा चमकत आहे. त्याच्यावर एखादे शिंग आले असावे असे द़ृश्य दिसत आहे. गेल्या 70 वर्षांच्या काळात प्रथमच या धूमकेतूवर स्फोट होत असताना पाहण्यास मिळाले.

या धूमकेतूचे नाव ‘12 पी/पोन्स-ब्रुक्स (12 पी) असे आहे. हा एक क्रायोव्होल्कॅनिक किंवा थंड ज्वालामुखी असलेला धूमकेतू आहे. धूमकेतूचा आकार एखाद्या मोठ्या शहराइतका आहे. सामान्यपणे धूमकेतू बर्फ, धूळ आणि वायूंच्या मिश्रणाने बनलेले ठोस पृष्ठभागाचे असतात. ते वायूच्या एका धुसर ढगाने आच्छादलेले असतात ज्याला ‘कोमा’ असे म्हटले जाते. तो धूमकेतूच्या अंतर्गत भागातून उत्सर्जित होत असतात. मात्र, बहुतांश धूमकेतूंच्या विपरित या ‘12 पी’ धूमकेतूच्या आत वायू आणि बर्फ इतके साठलेले आहे की तो हिंसक रूपात स्फोट करीत आहे. मोठमोठ्या भेगांमधून ही सामग्री बाहेर पडत आहे. तिला ‘क्रायोमॅग्ना’ असे म्हटले जाते.

20 जुलैला खगोलशास्त्रज्ञांनी या धूमकेतूमध्ये एक मोठा स्फोट पाहिला. त्यामुळे हा धूमकेतू एरव्हीपेक्षा शंभर पट अधिक चमकदार दिसून आला. ज्यावेळी या धूमकेतूचा कोमा अचानक अंतर्गत भागातून बाहेर येणार्‍या वायू व बर्फाच्या स्फटिकांसह पसरला त्यावेळी ही चमक आणखी वाढली. क्रायोव्होल्कॅनिक धूमकेतूंचा अभ्यास करणार्‍या रिचर्ड माईल्स या खगोलशास्त्रज्ञाने सांगितले की 26 जुलैला या धूमकेतूचा कोमा 2,30,000 किलोमीटरपर्यंत वाढला. याचा अर्थ हा धूमकेतू आपल्या अनुमानित 30 किलोमीटर व्यासापेक्षा 7 हजार पट अधिक मोठा दिसू लागला!

Back to top button