नाशिक : आषाढ अमावास्येनिमित्त उत्तरभारतीय भाविकांची त्र्यंबकवारी, कुशावर्तावर उसळली गर्दी | पुढारी

नाशिक : आषाढ अमावास्येनिमित्त उत्तरभारतीय भाविकांची त्र्यंबकवारी, कुशावर्तावर उसळली गर्दी

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी आषाढी अमावास्येनिमित्त देवदर्शन, स्नान आणि धार्मिक विधी यासाठी भक्तांची सकाळपासून कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी उसळली. त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या.

अमावास्या असल्याने धार्मिक विधी करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. रविवारी सायंकाळपासून भाविकांचा ओघ सुरू झाला होता. शहरात सर्व लॉजिंग बोर्डिंग, धर्मशाळा फुल्ल झाल्याने काही भाविकांनी रस्त्यावरच मुक्काम करावा लागला. सोमवती अमावास्येला उत्तरभारतीय भाविकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आली.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना दर्शनासाठी सोडताना मंदिर ट्रस्ट प्रशासनाची कसोटी लागत आहे. रात्री नऊ वाजता मंदिर बंद करण्याची वेळ आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून पूर्व दरवाजा दर्शनबारी आणि 200 रुपये थेट दर्शनबारी या दोन्ही रांगा पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. साधारणत: दोन दर्शनबारी मिळून सहा हजारांच्या आसपास भाविक थांबलेले असतात. त्यांना दर्शन घेऊन बाहेर यायला रात्रीचे बारा वाजतात. यासाठी रात्री आठ वाजेनंतर दर्शनबारीत प्रवेश बंद करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची चर्चा आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सोमवार व्हीआयपी दर्शन बंद ठेवणे, दररोज स्थानिक भाविकांना सभामंडपाच्या उत्तर दरवाजाने 200 रुपये रांगेतून आत सोडणे, सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाने आत जाण्यास प्रतिबंधित करणे आणि केवळ बाहेर जाण्यासाठी मार्ग ठेवणे यासारख्या उपाययोजना करण्याचे ठरवण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button