आरोग्य विमाही बनला स्मार्ट, 'या' आजारपणांना मिळते विमा कवच

काही वर्षांपर्यंत बहुतांश विमा पॉलिसी या पारंपरिक पद्धतीच्या होत्या आणि त्यानुसार ठरावीक आजारांनाच विमा कवच दिले जायचे. परंतु ‘इर्डा’ या नियामक संस्थेने विमा योजनेत वेळोवेळी सुधारणा केल्या. आज विमा पॉलिसी आपल्याप्रमाणेच ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. गरजेनुसार आजारपणांना विमा कवच प्रदान केले जात आहेत.
कोरोना साथीच्या परिणामाने आरोग्य विमा उद्योगात असलेल्या अनेक त्रुटी समोर आल्या. परिणामी ‘इर्डा’ने या उणिवा, दोष दूर करण्याच्या द़ृष्टीने विमा नियमात अनेक बदल केले. आरोग्य विमा उद्योगात व्यापक सुधारणा होत असल्याचे पाहून नागरिकदेखील आरोेग्य विम्याबाबत सजग झाले. शिवाय विमा कंपनीनेदेखील आपल्या योजनेत बदल केला आणि सुधारणा केल्या. एकीकडे कोरोनाचा काळ हा आरोग्य विमा कंपन्या आणि विमाधारकांना हा झोपेतून खडबडून जागे करणारा ठरला. त्याचवेळी दुसरीकडे विमा नियामक ‘इर्डा’ने या उद्योगात असलेल्या अनेक दोष, त्रुटी दूर करण्याची संधी साधली.
सर्व प्रकारच्या आजारांना कवच
काही वर्षांपर्यंत मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांना विमा कवच दिले जात नव्हते; परंतु सध्या स्थिती वेगळी आहे. विमा कंपन्या या आजारांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आरोग्य विमा कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील अनेक सुविधाजनक योजना बाजारात आणल्या. काही नियम आणि अटीची पूर्तता केल्यास आजाराला कवच मिळते. आरोग्य विमा कंपनी असो किंवा आरोग्य विमा देणारी सामान्य विमा कंपनी असो, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेनुसार बाजारात विमा योजना आणल्या आहेत. आपण आरोग्य विम्याशी संबंधित एखादी योजना खरेदी करू इच्छित असाल, तर सर्वात अगोदर विमा प्रतिनिधी किंवा सल्लागाराशी संबंधित विविध प्रकारच्या आजारांना विमा कवचची माहिती मिळवणे गरजेची आहे.
मातृत्व आणि सरोगसीशी संबंधित पॉलिसी
विमा नियमात सुधारणा झाल्यानंतर आता सरोगेट माता आणि दाता या दोघांनाही विमा कवच प्रदान केले जात आहे. गर्भधारणा हे आजारपण नाही. तरीही मातृत्व किंवा प्रसूतीच्या काळात होणार्या उपचारांना कवच देण्याची सुविधा सामान्य आरोग्य विमा योजनेत नसते. पण आता आरोग्य विमा उद्योगात व्यापक सुधारणा होत असताना मातृत्व आणि सरोगसीसाठी विमा योजना आणली जात आहे. सरोगसीसाठी आता 36 महिन्यांपर्यंत ‘सरोगेट मदर’ला विमा कवच प्रदान केले जात आहे. मातृत्वासाठी दोन प्रकारच्या योजना आहेत. यात पहिली म्हणजे पूर्वनियोजितपणे गर्भधारणा ठेवणे आणि त्याचे विम्याचे कवच घेणे आणि दुसरे म्हणजे गर्भधारणेनंतर विमा योजना घेणे. साहजिकच, या दोन्ही योजनेतील हप्त्यात फरक आहे. परंतु सुविधानुसार दर महिन्यांला उपचार, प्रसूतीच्या काळात सिझेरियनचा खर्च, शस्त्रक्रियेनंतर मर्यादित काळापर्यंत बालकाला कवच आदींचा विम्यात समावेश असतो.
ग्राहकांच्या गरजेनुसार पॉलिसी
आरोग्य विमा कंपन्या या विमाधारकाच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि उत्पन्नाच्या मर्यादेनुसार विमा पॉलिसी उपलब्ध करून देत आहेत. यासाठी ‘फाइल अँड यूज’च्या प्रक्रियेला परवानगी देण्यात आली आहे. यानुसार विमा कंपन्या ग्राहकांना अधिकाधिक सुविधा प्रदान करत आहेत. परिणामी ग्राहकांना खूप फायदा होत आहे.
ओपीडी कवच आणि अन्य खर्च
आरोग्य खर्चात सुमारे 14 टक्के वार्षिक दराने वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर आजारपणाच्या खर्चाचा समावेश असलेल्या विमा कवचच्या योजना घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. काही वर्षांपर्यंत 25 लाखांपर्यंतची पॉलिसी ही दुर्मीळ होती. आता बहुतांशजण सहजपणे घेताना दिसून येतात. आरोग्य विम्यातील योजनात एक अडचणींची गोष्ट म्हणजे या विम्याचा लाभ घेण्यासाठी किमान चोवीस तास रुग्णालयात भरती असणे गरजेचे आहे. परंतु आजच्या काळात ओपीडीदेखील महत्त्वाची ठरत आहे. ओपीडीतच लोकांचे काम भागत आहे. त्यामुळे या क्षेत्रातही दोन प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या.
पहिले म्हणजे आरोग्य विमा योजनाच्या अॅपमध्ये एका नवीन तरतुदीनुसार ई-कन्सल्टेंशनच्या माध्यमातून विम्याच्या काळात डॉक्टरांना कितीही फोन करून आरोग्याविषयीच्या तक्रारी सांगू शकतो. यासाठी कोणताही जादा हप्ता द्यावा लागत नाही. दुसरा मार्ग म्हणजे आरोग्य विमा योजनेत रायडर म्हणून ओपीडीचा समावेश केला गेला आहे. आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर ही सुविधा घेऊ शकतो. या पर्यायात 15 ते 20 टक्के जादा हप्ता भरावा लागतो. यानुसार डॉक्टरचे शुल्क, फार्मसीचे बिल, पॅथोलॉजिकल तपासण्या आदींचे दावे तातडीने निकाली काढले जातात. या पर्यायात ओपीडीला पाच ते 50 हजारांपर्यंत कवच प्रदान केले जात आहे.
मानसिक आजाराला कवच
आरोग्य विमा योजनेत आणखी सुधारणा म्हणजे सर्व विमा कंपन्यांकडून मानसिक आजारालादेखील पुरेसे कवच देण्याचा विचार केला जात आहे. नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, बायपोलर डिसऑर्डर आदींना पुरेसे कवच देण्याबाबत विचार सुरू आहे.
वेलनेस बेनिफिट
आरोग्य विमा क्षेत्रात आणखी एक सुधारणा करण्यात आली आहे. ज्या विमाधारकांना आरोग्य जपण्याबाबत चांगल्या सवयी असतील, तर त्यांना नूतनीकरण करताना हप्त्यात काही प्रमाणात सवलत दिली जात आहे. याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. उदा. आपला आरोग्य विमा असेल आणि एकूण 120 दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी किमान दहा हजार पावले चालत असाल, तर पुढील वर्षी नूतनीकरण करताना हप्त्यात किमान दहा टक्के सवलत मिळते. यानुसार आपण चालण्याच्या दिवसांत वाढ केली तर सवलत आणखी वाढू शकते.