सांगली : शिराळ्यात राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान? | पुढारी

सांगली : शिराळ्यात राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान?

शिराळा; संंग्रामसिंह पाटील : शिराळा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा येथे भाजपला फारसा फायदा होईल, असे सध्यातरी वाटत नाही. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे येथे राष्ट्रवादी आधीच भक्कम आहे. तर दुसरीकडे महाडिक-देशमुख गटाच्या मनोमिलनामुळे भाजपाचे या ठिकाणी आव्हान राहणार आहे. मात्र आगामी काळात या मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपमध्ये सत्तासंघर्ष अटळ आहे.

शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथे कोणताही नेता किंवा कार्यकर्ता अद्याप अजित पवार गटाच्या हाताशी लागलेला नाही. आमदार मानसिंगराव नाईक हे दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मतदारसंघात येणार्‍या वाळवा तालुक्यातील 48 गावांतील आ. पाटील यांच्या गटाची ताकद आ. मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी आहे.
याचदरम्यान आता भाजपचे माजी आ. शिवाजीराव नाईक यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचा या मतदारसंघात पक्षासाठी कोणताही फरक पडलेला नाही. मात्र तरीही भविष्यात राष्ट्रवादीतील काही असंतुष्ट कार्यकत्यार्र्ंंना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होऊ शकतो.

दरम्यान, शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे भाजपची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र तरीही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे भाजपचे प्रमुख सत्यजित देशमुख, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सम्राट महाडिक यांनी मतदारसंघात भाजप पक्ष विस्तारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आपआपसातील मतभेद विसरुन या दोन्ही नेत्यांनी पक्षाचे काम तळागाळात पोहोचवत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनामुळे आगामी निवडणुकीत भाजप एकसंघपणे राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या चांगलाच तयारीत आहे.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी न दिल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात सम्राट महाडिक यांनी 40 हजारांवर मते घेतली होती. पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा या पाच वर्षात मतदारसंघात संपर्क वाढवून निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. सत्यजित देशमुख हेही पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. तेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याकडे लक्ष असणार आहे. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. मतदारसंघात शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) अभिजित पाटील यांची मोठी ताकद आहे.

आगामी काळात या मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपमध्ये सत्तासंघर्ष अटळ आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक, माजी सभापती सम्राटसिंह नाईक ही युवा मंडळीही शरद पवार यांच्यासाठी रिंगणात आहेत. अजित पवार गटात राष्ट्रवादीच्या कोणीही अद्याप प्रवेश केला नसला तरीही भविष्यात येथे अजित पवार यांची छुपी मदत राष्ट्रवादी विरोधकांना होवू शकते.

विधानसभेसाठी महाडिक यांची तयारी

आ. शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर येथे भाजपला काही प्रमाणात फटका बसला आहे. तरीही शिवाजीराव नाईक गटाच्या नाराज कार्यकत्यार्ंशी संपर्क करत सम्राट महाडिक यांनी आपला गट आणखी भक्कम करण्यावर भर दिला आहे. वाळवा तालुक्यातील 48 गावांबरोबरच शिराळा तालुक्यातील गावा-गावातही युवकांचे संघटनही त्यांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात सम्राट महाडिक हेच आ. मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Back to top button