Nashik : निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर | पुढारी

Nashik : निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात देशातील कामाख्या देवीचे दुसरे मंदिर साकारले जात आहे. पहिले मंदिर आसाममध्ये असून, दुसरे मंदिर निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे साकारत आहे. साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. यानंतर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात केला जाणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली.

सव्वा एकर जागेत मंदिर साकारत आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे ५१ भाग केले होते आणि ज्या ठिकाणी ते भाग पडले ते ठिकाण शक्तिपीठ म्हणून नावारूपाला आल्याचे सांगितले जाते. धारणगाव खडक येथे साकारत असलेल्या मंदिराला १११ खांब आहे. २१ कळसांपैकी मुख्य तीन सोन्याचे आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान व मध्य प्रदेशातील २५० कारागीर मंदिराच्या उभारणीसाठी मेहनत करत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना गणेश महाराज जगताप म्हणाले की, सती देवीने दिलेल्या दृष्टांतानंतर मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. प्रवेशव्दारामधून आत गेल्यावर पूर्वेला भव्य व आकर्षक गणेश मंदिर, पश्चिमेला शिवपार्वती मंदिर तर उत्तरेला धन कुबेर, धनलक्ष्मी व धनदीप या देवतांची मंदिरे आहे. आग्नेयला सप्तशती चंडी हवन आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी साधू-संत, महंतांची उपस्थिती असणार आहे. हा सोहळा ११ दिवसांचा होईल. परराज्यांतून व परगावाहून येणाऱ्या भक्तांच्या निवासाची आणि महाप्रसादाची सुविधा सिद्ध माँ कामाख्या चॅरिटेबल ट्रस्ट, बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्टतर्फे केली जाणार असल्याची माहिती गणेश जगताप यांनी दिली.

सोन्याच्या कळसाचे आकर्षण

मंदिरावरील तीन सोन्याच्या कळसांपैकी पहिल्या कळसाखाली सिद्ध कामाख्या देवीचे मंदिर आहे. खांबाच्या चारही बाजूने देव-देविकांच्या मूर्तीच्या प्रतिकृती दिसतील. प्रमुख कळसावर बावनबीर देवतांच्या मूर्तीच्या प्रतिकृती असणार आहे. मधील बाजूने छताला आणि भिंतीला रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी सजविले आहे.

हेही वाचा : 

Back to top button