मांडवगण फराटा : ग्रामीण भागातील राजकीय नेते संभ्रमात | पुढारी

मांडवगण फराटा : ग्रामीण भागातील राजकीय नेते संभ्रमात

मांडवगण फराटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस राजकारणामध्ये बदल होत चालला असून, सत्तेसाठी राजकीय नेतेमंडळी काही करू शकतात, याची प्रचिती सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येते आहे. ग्रामीण भागातील राजकीय नेते मात्र आता पूर्णपणे संभ्रमात आहेत. कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा हात धरावा, याबाबतीत त्यांच्या मनात अनेक शंका आहेत.
एकेकाळी शिरूर तालुक्यातील राजकीय नेतेमंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

त्यानंतर काही दिवसांमध्येच निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. तीच परिस्थिती सध्या भाजपची सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंडळीची आहे. सध्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे की ज्या नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचा आरोप होऊन त्यांची चौकशी केली गेली होती. या भीतीपोटी व सत्तेतील लालसेपोटी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

ज्याप्रकारे शिवसेनेमध्ये शिंदे गट तयार झाला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप करता करता यामध्ये वर्ष कधी संपले तेच समजले नाही. त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येदेखील सध्या दोन गट होऊन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुढील निवडणुकीपर्यंत हा वाद असाच सुरू राहील, शिवाय अजून कोणकोणते नेते, पक्ष पुढील निवडणुकीपर्यंत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्तेतील लालसेपोटी बदलतील, हे सांगता येत नाही, अशी चर्चा ग्रामीण भागात आहे.

शिरूर तालुक्यामधील आमदार अशोक पवार जर अजित पवार यांच्या गटामध्ये गेले, तर शिरूर तालुक्यातील राजकारणाला विरोधक राहणार नाहीत, परंतु आमदार अशोक पवार जर शरद पवार यांच्या गटात राहिले, तर राजकारणात त्यांना जुनेच विरोधक असतील. परंतु आता अशोक पवार कोणत्या गटाकडून ठामपणे उभे आहेत, असे सांगता येत नाही, अशी चर्चा सामान्य जनतेमध्ये आहे.

परंतु आमदार अशोक पवार हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील जे राजकीय नेते आहेत ते अशोक पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असून, आमदार अशोक पवार जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वागत करतील, तसेच काही राजकीय नेते असेपण आहेत ज्या घरी दिवाळी त्या घरचा पाहुणा, अशी भूमिका तालुक्यात पाहायला मिळू शकते.

हेही वाचा

पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट अटळ!

आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

शेती महामंडळ जमिनीवर लॉजिस्टीक पार्क : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Back to top button