नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांनी माझे घर मी नव्याने बांधेल असे नमूद केले. म्हणजेच घर पडले पवार यांनी प्रथमच मान्य केले. इतकी वर्षे आमची घरे पाडत होते असे सांगताना 'जैसी करणी वैसी भरणी' अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खाेत यांनी पवार यांच्यावर शरसंधान साधले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खोत यांनी गुरुवारी (दि.६) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना तुमच्यामुळे अनेकांची घरे उद्धस्त झाली. शेतकरी आत्महत्या झाल्या. गावगाड्याचे नुकसान झाले. शेतकरी विरोधी पवार या नेत्याला रोखणे हे आमचे एकमेव लक्ष आहे. त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचा आरोप खाेत यांनी केला.
सध्याच्या राजकीय घडामोडीत प्रत्येकजण आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करताे. महायुतीत नव्याने जोडलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्वागत आहे. पण, भाजपने २०१४ पासून सोबत असलेल्या घटक पक्षांना सत्तेत सामावून घेतले पाहिजे. जावई येत असताना घरच्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, याची दक्षता भाजपने घ्यावी, असा सल्ला खोत यांनी दिला. भाजपने घटक पक्षांना जेव्हा शक्य होते, तेव्हा संधी दिलेली आहे. भाजपच्या जवळ गेले की, तो पक्ष संपवतो असा आभास निर्माण केला जातो. असे कुणी कोणाला संपवत नसते. नवीन लोक येत आहेत म्हणून कुणीही अस्वस्थ होणार नाही. आमच्यासह भाजपमध्ये कुणी नाराज नसल्याचे खोत यांनी सांगितले.
बारामतीचा अश्वमेध राेखला
गतकाळात राज्यात कुणाचेही सरकार आले तरी अंमल बारामतीचा चालायचा. बारामतीचा हा अश्वमेध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखला. राष्ट्रवादीची मंडळी केवळ मुंडावळ्या बांधण्यापुरती ठाकरे गटासोबत आली होती, हे आता उध्दव ठाकरे यांच्या लक्षात आले असेल. राजकीय पेचात ठाकरेंचे महाचाणक्य संजय राऊत काय करतात ते पाहू असा टोला त्यांनी लगावला.
ती समिती बकवास
दोन साखर कारखान्यांमधील अंतराबाबत मुख्यमंत्र्यांनी स्थापलेली समिती बकवास आहे. या समितीच्या माध्यमातून त्यांनी आमच्या कोपराला गूळ लावला आहे. जो खाता येत नाही व दाखवताही येत नाही. या समितीमार्फत कुठलाही निर्णय होणार नसल्याचा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
हेही वाचा :