Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा सराईत गजाआड | पुढारी

Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा सराईत गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुन्या वादातून प्रतिस्पर्धी गटातील युवकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेने चार महिन्यांनंतर पकडले आहे. कार्बन नाका परिसरात मार्च महिन्यात सराईत गुन्हेगारांनी चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिंदे गावात सापळा रचून अक्षय उत्तम भारती (२४, रा. कार्बन नाका) यास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

कार्बन नाका परिसरात १९ मार्च रोजी भरदिवसा संशयितांनी स्कोडा कारला पाठीमागून धडक दिली आणि दोघांवर गोळीबार केला होता. या प्रकरणी अक्षयसह इतरांविरोधात सातपूर पोलिसांत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर संशयित अक्षय भारती फरार होता. अक्षय हा शिंदे गावात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकास मिळाली. त्यानुसार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने सापळा रचून बुधवारी (दि.२१) रात्री शिंदे गावातून अक्षयला पकडले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक दुचाकी असा एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे, नितीन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनील आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

पूर्ववैमनस्यातून झालेला हल्ला

राहुल पवार याच्या फिर्यादीनुसार, संशयित आशिष राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, गणेश राजेंद्र जाधव, सोमनाथ झंजार आणि किरण चव्हाण यांनी राहुलसह तपन जाधव याच्यावर कार्बन नाका परिसरात गोळीबार केला होता. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.

………………………………….

Back to top button