मणिपुरात स्फोट; दोघे ठार, चौघे गंभीर | पुढारी

मणिपुरात स्फोट; दोघे ठार, चौघे गंभीर

इंफाळ, पीटीआय : ईशान्येकडील मणिपूर राज्यात हिंसाचाराच्या जोडीला स्फोटांचे सत्र सुरू झाले असून बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथे एका पुलाजवळ उभ्या असलेल्या एसयूव्हीमध्ये आईडीचा (इंप्रुवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) स्फोट होऊन त्यात दोन ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

कारमध्ये ठेवण्यात आलेल्या या शक्तिशाली स्फोटकांचा स्फोट ड्रायव्हर कारमधून खाली उतरताना झाला. यावेळी गाडीजवळ उभे असलेले दोघे ठार झाले व अन्य जखमी झाले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सुरक्षा दलांनी या परिसराची नाकेबंदी केली आहे. जखमींची संख्या आणखी वाढू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

दोन जवान जखमी

एन बोलजँग येथे समाजकंटकांनी केलेल्या बेछूट गोळीबारात लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. गुरुवारी ही घटना घडली. सुदैवाने दोन्ही जवानांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. बोलजँग परिसरात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. या ठिकाणी एक मशिनगन जप्त करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी जवानांवर अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. पाठोपाठ जवानांवरील हल्ल्याची ही दुसरी घटना घडली आहे.

आतापर्यंत शंभराहून अधिक मृत्यू

मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. राज्यात जवळपास 50 दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, हिंसाचाराच्या घटना थांबायचे नाव नाही.

नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने 24 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गृह मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 जून रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेसने मात्र याला विरोध दर्शविला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, ही बैठक नवी दिल्लीत न घेता ती थेट मणिपूरमध्ये आयोजित केली पाहिजे. तसेच केंद्र सरकार मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Back to top button