

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच रस्त्यावरील गुन्हे कमी करण्यासाठी परिमंडळ एकमध्ये टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गत आठ दिवसांत पोलिसांनी रात्री गस्त घालत ९०० टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विविध मोहिम राबवल्या जात आहेत. त्यानुसार परिमंडळ एकमधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे. शहरातील महाविद्यालये आणि शाळा सुरु झाल्याने शैक्षणिक संस्थाजवळ टवाळखोरांचा वावर पहावयास मिळतो.पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्वाधिक टवाळखोर गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे दिसते. पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, दिलीप ठाकूर, अशोक साखरे, अनिल शिंदे, युवराज पत्की, इरफान शेख, प्रवीण चव्हाण यांच्या पथकांनी पोलिसांची साध्या वेशातील गस्त वाढवली आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करणारे, चौकाचौकात टवाळक्या करणाऱे, नागरिकांना त्रास देणारे, महाविद्यालयाबाहेर छेड काढणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.
पोलिस ठाणेनिहाय कारवाई
गंगापूर : २३४
भद्रकाली : १५८
पंचवटी : १३५
आडगाव : १०८
म्हसरुळ : १०७
मुंबई नाका : ८६
सरकारवाडा : ७१
एकूण : ९००
हेही वाचा :