नाशिकला दोन दिवसांत लाभणार नवे अधिकारी, गिरीश महाजन यांची माहिती | पुढारी

नाशिकला दोन दिवसांत लाभणार नवे अधिकारी, गिरीश महाजन यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, अंतिम स्वाक्षरीसाठीची फाइल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचली आहे. दोनच दिवसांमध्ये नाशिकला चांगले अधिकारी लाभतील, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि.१८) दिली.

गेल्या तेरा दिवसांपासून नाशिक महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त नसल्याने शहराचा कारभार वाऱ्यावर आहे. आयुक्तांविना शहर विकासाची कामे ठप्प पडली असून, छोटी-मोठी कामे होताना दिसून येत नाही. असे असताना शासनस्तरावरून याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे आठवड्याभर सुट्टीवर गेलेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याही बदलीची दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत. मात्र, बदलीचा अंतिम आदेश निघत नसल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. महाजन यांना आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल विचारले असता दोन दिवसांमध्ये याचा निर्णय होईल. नाशिक मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अशी दोघांच्या नावाची फाइल मुख्यमंत्री शिंदे यांच्या टेबलवर पोहोचली आहे. दोनच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची फाइलवर स्वाक्षरी होऊन जिल्ह्याला चांगले अधिकारी लाभतील. त्यामुळे लवकरच कामे सुरळीत होतील, असा विश्वासही ना. महाजन यांनी व्यक्त केला.

कोणाचाही नंबर लागेल : महाजन

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विस्तारात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय भाजप-शिवसेनेने घ्यायचा आहे. लवकरच दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती ना. महाजन यांनी दिली. विस्तारात नाशिकला संधी मिळणार का? या प्रश्नावर कोणाचाही नंबर लागू शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. नाशिकच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा आपल्याकडे येणार यावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी नम्रपणे आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button