अवकाशातील हवामानाचा वेध घेणारा इस्रोचा टेलिस्कोप | पुढारी

अवकाशातील हवामानाचा वेध घेणारा इस्रोचा टेलिस्कोप

पुणे : ‘आयुका’ने सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप यशस्वीरित्या तयार केला असून तो लवकरच आदित्य-एल1 मिशनचा अविभाज्य घटक असणार आहे. सध्या हा टेलिस्कोप इंटर युनिव्हर्सिटी सेंटरने इस्रोकडे सुपूर्द केला आहे.

हा टेलिस्कोप सॅटेलाईटशी लाँच केला गेल्यानंतर सूर्याच्या दिशेने साधारणपणे 1.5 दशलक्ष किलोमीटर्सचा प्रवास करणार असून एल-1 पॉईंटवरून सूर्यावरील पृष्ठभूमी व अवकाशातील हवामानाबाबत सातत्याने अपडेटस व फोटो पाठवणार आहे.

प्रो. ए. एन. रामप्रकाश व प्रो. दुर्गेश त्रिपाठी यांनी या प्रोजेक्टचे नियोजन केले. शिवाय, इस्रोसमवेत सातत्याने संपर्कात राहत याला गती दिली. या टेलिस्कोपच्या माध्यमातून पुरवली जाणारी निरीक्षणे अल्ट्राव्हायलेट क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहेत.

या प्रोजेक्टची सविस्तर माहिती देताना रामप्रकाश म्हणाले, ‘आदित्य-एल1’वर सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप महत्तवाचा घटक असेल. या टेलिस्कोपच्या माध्यमातून 2000-4000 ए वेवलेंग्थ रेंजने डिस्क इमेजिस मिळणे अपेक्षित आहे. यापूर्वी पूर्ण वेवलेंग्थ रेंजमध्ये पूर्ण डिस्क इमेजिस केव्हाही प्राप्त झालेले नाहीत. आता या टेलिस्कोपच्या माध्यमातून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देखील मिळणे अपेक्षित असून यात प्रामुख्याने कूलर सरफेसवरील हायर टेम्परेचर एक्झिस्टन्स, अल्ट्राव्हायलेट रेडिएशनचे ओरिजन व व्हेरिएशन, सोलार फ्लेयरसारखे हाय एनर्जी एक्स्प्लोजन्सचा त्यात समावेश आहे’.

Back to top button