नाशिकमध्ये आयकरचे पुन्हा छापे; दोन बिल्डर्स, दोन सीए, एका फायनान्स सर्व्हिसेसवर धाड | पुढारी

नाशिकमध्ये आयकरचे पुन्हा छापे; दोन बिल्डर्स, दोन सीए, एका फायनान्स सर्व्हिसेसवर धाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह उद्योजक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वीच शहरातील पाच बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकणाऱ्या आयकर विभागाने बुधवारी (दि.१४) पुन्हा एकदा दोन बांधकाम व्यावसायिकांसह दोन सनदी लेखापाल व एका फायनान्स सर्व्हिस कंपनीवर छापे टाकले आहेत. यावेळी आयकरच्या ५० अधिकाऱ्यांच्या दहा-दहाच्या टीमने या व्यावसायिकांच्या १५ ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच आयकर विभागाने शहरातील पाच बड्या बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर महिनाभरापूर्वी सातपूर विभागातील कारखान्यांवर छापे टाकले होते. आता आयकर विभागाने बांधकाम व्यावसायिकांसह सनदी लेखापालांवर लक्ष केंद्रित केले असून, दिवसभर छापासत्र सुरू ठेवले. बांधकाम व्यावसायिक, सीए व फायनान्स सर्व्हिसेस कंपनीच्या कार्यालयात दिवसभर शोधमोहीम सुरू होती. यावेळी ५० अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. संबंधितांच्या १५ ठिकाणी या टीमने दिवसभर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. हवालाच्या माध्यमातून आलेल्या पैशांची झडती घेण्यासाठी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून सातत्याने नाशिक शहरातील बडे उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांवर धाडी टाकल्या जात आहेत. या कारवाईत आतापर्यंत मोठे घबाड आढळून आले असून, या नवीन कारवाईतदेखील मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई पुढील तीन ते चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button