जगभरातील अनिवासी भारतीयांना आकर्षित करण्यासाठी भारतीय नेत्यांकडून होणारे प्रयत्न आपण पाहत असतो. अलीकडेच राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा पार पडला. अनिवासी भारतीयांचे जागतिक अर्थकारणात वाढते महत्त्व लक्षात घेता 2024 च्या निवडणुकीअगोदर अनिवासी भारतीयांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, याची काँग्रेसला जाणीव झाली.
भारतीय नेते अमेरिका आणि अन्य ठिकाणच्या अनिवासी भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न का करतात, असा प्रश्न भारतीयांना पडू शकतो. कारण, अनिवासी भारतीय नागरिक हे लोकसभा, विधानसभेच्या मतदानात सहभाग घेत नाहीत, मग ते आपल्या मातृभूमीत रस का घेतील? कदाचित भारताचा जीडीपी वाढतो तेव्हा भारताच्या परराष्ट्र धोरणात अनिवासी भारतीयांची भूमिका आपोआपच वाढू लागते. म्हणूनच राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, विरोधी पक्षाचे नेते असो किंवा मंत्र्यांचे दौरे त्यांच्या परदेश दौर्यात अनिवासी भारतीयांचा प्रामुख्याने सहभाग असतोच. जगातील बहुतांश विकसित देशांत अनिवासी भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. ती 32 दशलक्षपेक्षा अधिक असून, ते जगातील सर्वाधिक धनाढ्य अनिवासींपैकी एक मानले जातात. आजघडीला दरवर्षी अडीच दशलक्ष भारतीय हे अन्य देशांत प्रवास करतात.
शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात राहणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यानुसार अनिवासी भारतीयांची मालमत्ता फेब—ुवारी 2023 पर्यंत 136 अब्ज डॉलरवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावेदार मानल्या जाणार्या निक्की हॅली, विवेक रामास्वामी यासारखे भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेतील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनाक आता बि—टनचे पंतप्रधान आहेत.
कॉर्पोरेट जगातही अनिवासी आणि भारतीय वंशांच्या नागरिकांचा दबदबा राहिला आहे. सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), सुंदर पिचाई (गुगल), शंतनू नारायण (अडोब) हे आता महाकाय अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख आहेत. अजय बंगा हे अलीकडेच जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. यानुसार भाजपने अनिवासी भारतीयांचे महत्त्व खूप अगोदरच समजले होते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आक्रमक रीतीने आपल्या दौर्यात त्यांना आकर्षित करत असतात. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नियमित राजदूताव्यतिरिक्त आणखी एक राजदूत अमेरिकेत नेमला होता. अर्थात, त्यांना माघारी बोलावण्यात आले. कारण, अमेरिकेने त्यास मान्यता दिलेली नव्हती. काँग्रेस पक्षाने अनिवासी भारतीयांना कधीच गांभीर्याने घेतले नाही. कदाचित स्वातंत्र्यानंतर 'ग्रँड ओल्ड पार्टी'ने 59 वर्षे देशावर राज्य केल्याने पक्षाने अनिवासी भारतीयांना गृहीत धरले असेल.
इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांना आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत. राहुल गांधी यांचा 2017 मध्ये नेते म्हणून केलेला पहिला अमेरिकी दौरा यशस्वी ठरला आणि ते आता त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. मार्च महिन्यातील बि—टनचा दौरा आणि या आठवड्यातील अमेरिका दौरा हा इमेज बिल्डिंगच्या प्रक्रियेचा भाग आहे. सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखालील निष्क्रिय झालेली ओव्हरसिज काँग्रेस आता सक्रिय झाली आहे. राहुल गांधी यांनी यावर्षी भारत जोडो यात्रा यशस्वी केली आणि त्यात त्यांची प्रतिमा आणखी उजळून निघाली आहे. याचा लाभ कर्नाटकमध्ये झाला आणि राज्य पादाक्रांत केले. अनिवासी भारतीयांचे जागतिक अर्थकारणात वाढते महत्त्व लक्षात घेता 2024 च्या निवडणुकीअगोदर अनिवासी भारतीयांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, याची काँग्रेसला जाणीव झाली.
पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत अमेरिका दौर्याच्या तीन आठवडे अगोदर राहुल गांधी यांनी अमेरिकेचा दौरा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भोजनाचे आयोजन केले आहे. यानुसार मोदी चर्चेत येतील. दुसर्या टर्ममधील त्यांचा हा शेवटचा अमेरिका दौरा असेल. मोदी यांनी 2014 च्या दौर्यात न्यूयॉर्कच्या मेडिसीन स्क्वेअर गार्डन येथे अनिवासी भारतीयांची मने जिंकली आहेत. 2019 मध्ये ह्यूस्टन येथे 'हाऊडी मोदी रॅली' केली. या माध्यमातून त्यांनी 9 वर्षांत अनिवासी भारतीयांना आकर्षित केले आहे. तीन अमेरिकी अध्यक्ष ओबामा, ट्रम्प आणि बायडेन यांच्याबरोबर त्यांनी आपले नावही प्रचलित केले. राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौर्यात आयोजित विविध बैठकीत विद्यार्थी, शिक्षक, काँग्रेस आणि बुद्धिजीवींना एकत्र आणून चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला. आत्मविश्वासाने भारलेले राहुल गांधी यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारची चेष्टा केली. अनिवासी भारतीयांचे कौतुक करताना त्यांनी अमेरिकेत भारतीय ध्वज फडकविल्याबद्दल खूप खूप आभारी असल्याचे नमूद केले.
कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन येथेही बैठका घेतल्या. वॉशिंग्टन येथे नॅशनल प्रेस क्लबच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची दमदार वापसी होईल, अशी आशा व्यक्त केली. गांधी यांनी चीन आणि रशियासह भारताच्या संबंधाबाबतही चर्चा केली. राहुल गांधी मॅनहटन येथे जेकब जेविटस् सेंटर येथे बोलताना म्हणाले की, अहंकारी, हिंसक असणे हे जनतेसाठी वाईट असते. या गोष्टी भारतीय मूल्यांच्या नाहीत. त्यांनी अमेरिका आणि स्वदेशातील भारतीयांना लोकशाही आणि घटनेसाठी पाठबळ देण्याचे आवाहन केले.
न्यूयॉर्कचे सर्वाधिक गजबजलेले आणि प्रसिद्ध चौकापैकी एक असणार्या टाइम्स स्क्वेअर येथील बिल बोर्डवर भारत जोडो यात्रेचे प्रदर्शन करण्यात आले. आजघडीला खासदार नसलेले आणि नेते असणारे राहुल गांधी यांच्यासाठी इंडियन ओव्हरसिज काँग्रेसने बर्यापैकी गर्दी जमविली. भाजप मात्र राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर झालेल्या टीकेबद्दल नाराज आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. तत्पूर्वी, बि—टनच्या दौर्यात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप मंत्र्यांनी केली होती. बि—टनमध्ये जाऊन देशाची बदनामी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तूर्त राहुल गांधी यांच्या अमेरिका दौर्यावरून काँग्रेस समाधानी आहे. परंतु, त्यांनी मोदींना दोष देण्याऐवजी वेगळे काहीतरी करण्याची गरज आहे. राहुल यांनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी नवा द़ृष्टिकोन मांडायला हवा. भारतातील कळीच्या मुद्द्यावर आणखी बोललेे पाहिजे.
– कल्याणी शंकर, आंतरराष्ट्रीय अभ्यासक