राज्यात यंत्रावरील ऊस तोडणीसाठी हवा एकसमान दर ; साखर आयुक्तांकडे  ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी | पुढारी

राज्यात यंत्रावरील ऊस तोडणीसाठी हवा एकसमान दर ; साखर आयुक्तांकडे  ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी

 पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  राज्यात संपलेल्या 2022-23 या ऊस गाळप हंगामात मशीनद्वारे ऊस तोडणीस प्रति टनास 360 ते 420 रुपये दर दिला आहे. तर भुईज (सातारा) येथील किसनवीर सहकारी व फलटण येथील दत्त इंडिया प्रा.लि. या कारखान्यांनी हाच दर प्रति टनास 510 रुपये दिलेला आहे. त्यामुळे एकसमान ऊस तोडणी दर देण्याची महत्वपूर्ण मागणी राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष उमेशचंद्र पाटील (कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.14) साखर आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी झालेल्या चर्चेत विविध मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटनेचे सचिव घनश्याम मारकड (सोलापूर), खजिनदार निलेश भुसे (पुणे), उपाध्यक्ष अविनाश सावंत (सातारा), ज्ञानोबा पाटील (सांगली), निलेश बगाडे (पुणे), विशाल मोरे (सांगली) आणि सदस्य शांतगोंडा पाटील यांचा समावेश होता.
बैठकीनंतर माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले,  राज्यात सन 2018-19 ते सन 2022-23 या कालावधीमध्ये राज्यातील शेतकर्‍यांना शेतीला जोडधंदा म्हणून बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जे घेऊन ऊस तोडणी मशीनची खरेदी केली. त्यातून 40 टक्के अनुदानाचा निर्णय असतानाही 2020 पुर्वीच्या खरेदी करण्यात आलेल्या ऊस तोडणी मशीन मालकांना अनुदानापासून वंचित ठेवले गेले आहे. ते तत्काळ देऊन झालेला अन्याय सरकारने दूर करावा, अशी मागणी केली आहे.
 ऊस तोडणी मशीनच्या सहाय्याने तोडणी केलेल्या उसाच्या वजनात साखर कारखाने 4.5 टक्क्यांइतके वजन कपात करतात. ही कपात ऊस तोडणी मशीन व्यवसाय धारकांच्यावर अन्याय करणारी आहे. ही कपात 4.5 टक्क्यांवरुन कमी करुन 2 टक्के करण्यात येऊन मशीन मालकांना दिलासा देण्याची महत्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करीत विविध योजना जाहिर केल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या ऊस तोडणी मशीन चालक व मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे ही वाचा : 

Back to top button