शाहरूख खान भाजपमध्ये गेल्यास ड्रग्जचे होईल पीठ : भुजबळांचा टोला | पुढारी

शाहरूख खान भाजपमध्ये गेल्यास ड्रग्जचे होईल पीठ : भुजबळांचा टोला

बीड, पुढारी ऑनलाईन

जर अभिनेता शाहरूख खान याने भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपवाले शाहरूखच्या मुलाकडे कोकेन नव्हे तर पीठ सापडलं म्हणून सांगतील, असा सणसणीत टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी  लगावला. ते बीडमध्ये बोलत होते.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. आर्यन खान हा सध्या आर्थर रोड कारागृहात आहे.

क्रूझवरील पार्टीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. या कारवाईत भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.तसेच भाजपशी संबधित नेत्यांच्या नातेवाईकांना या कारवाईतून सोडून दिल्याचा आरोप केला होता. या चर्चेत आता भुजबळ यांनीही उडी घेतली असून, ही कारवाई भाजप पुरस्कृत असल्याचा आराेपही त्‍यांनी केला.

भुजबळ म्हणाले, ‘सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. कोणावरही धाडी टाकल्या जात आहेत. शाहरुख खान उद्या भाजपामध्ये गेल्यानंतर इथं कोकेन नाही, तर पीठ सापडलं असं म्हणतील.’

ते पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्र सदन प्रकरणात माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठका घेतात. १०० कोटींचा ठेका घेऊन ८५० कोटींची लाच कुणी देईल का?

पाच फुटाच्या म्हशीला १५ फुटाचे रेडकू कसे होईल?’ माझ्या घरावर १७ वेळा धाडी पडल्या. धाडी पडल्या की माझी पत्नी, मुलं घाबरुन मॉलमध्ये जाऊन बसायचे. दिवसभर मॉलमध्ये राहायचे आणि रात्री परत घरी जायचे, असा आमचा दिनक्रम होता. तो काळ विचित्र होता. आताही राज्यात तेच सुरू आहे.

अजित पवारांच्या बहिणीची घरी धाडी टाकल्या. आठ-आठ दिवस अधिकारी घरात शिरून बसले होते. पण हाती काय लागले हे सांगत नाहीत, असेही ते म्‍हणाले.

हिंमत असेल तर फुटेज दाखवा…

मुबई एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर नेमके किती लोकांना पकडले आणि किती लोकांना सोडले याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी नबाब मलिक यांनी ‘एनसीबी’कडे केली आहे. एनसीबीने हिंमत असेल तर त्यांच्याकडील फुटेज जाहीर केले पाहिजे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे. क्रूझ पार्टीवर टाकलेली धाड बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मेहुण्याला सोडून दिल्याच्या आरोपानंतर एनसीबीने  खुलासा केला होता.

हेही वाचलं का ? 

Back to top button