ENGvsWI : ५६ धावा करतानाही इंग्लंडला घाम फुटला, बटलर होता म्हणून सामना जिंकला | पुढारी

ENGvsWI : ५६ धावा करतानाही इंग्लंडला घाम फुटला, बटलर होता म्हणून सामना जिंकला

दुबई : पुढारी ऑनलाईन

इंग्लंडने गतविजेत्या वेस्ट इंडीजचा ( ENGvsWI ) ६ गडी राखून पराभव करत टी २० वर्ल्डकची विजयी सुरुवात केली. वेस्ट इंडीजने इंग्लंडसमोर ५६ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र ते पार करतानाही इंग्लंडचे ४ फलंदाज खर्ची फडले. अखेर जोस बटलरने २२ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी करत ९ व्या षटकात सामना जिंकून दिला. विंडीजकडून डावखुऱा फिरकी गोलंदाज हुसैनने २४ धावात २ विकेट घेत इंग्लंडला सहजासहजी सामना जिंकून दिला नाही.

वेस्ट इंडीजने ठेवलेल्या ५६ धावांचे माफक आव्हान पार करतानाही इंग्लंडची गडबड झाली. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ३ षटकात २१ धावा करुन चांगली सुरुवात केली. ही जोडी बिनबाद ५६ धावा करले असे वाटत असतानाच रामपालने जेसन रॉयला ११ धावांवर बाद केले.

सलामी जोडी फुटल्यानंतर इंग्लंडच्या पुढच्या फलंदाजांची अकायल हुसैनच्या डावखुरी फिरकी गोलंदाजीवर पुरती धांदल उडाली. त्याने जोनी बेअरस्टोला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला मोईन अली ३ धावांवर धावबाद झाला. तर लिम लिव्हिंगस्टोनचा हुसैनने आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेत त्याला १ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे बिनबाद २१ धावांवरून इंग्लंडची अवस्था ४ बाद ३९ अशी झाली.

दरम्यान, जोस बटलर एका बाजूने तग धरून होता. त्याने आणि मार्गनने नवव्या षटकात विंडीजच्या ५६ धावा पार केल्या आणि इंग्लंडने विजयी निश्वास सोडला.

तत्पूर्वी, युएई आणि ओमानमध्ये होत असलेल्या टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीतील इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज ( ENGvsWI ) सामन्यात गतविजेत्या विंडीजचे टी २० मधील रथी महारथी पार ढेपाळले. पहिल्याच सामन्यात हे टी २० मधील झळाळणारे स्टार इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर निस्तेज झाले. विंडीजचा डाव १४.२ षटकात अवघ्या ५५ धावात संपुष्टात आला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सने इव्हिन लुईसला बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. मॉर्गनने विकेटचा नूर पाहून पॉवर प्लेमध्येच मोईन अलीकडे चेंडू सोपवला. त्यानेही लिंडन सिमन्सला ३ धावांवर बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

गेला झाला फेल ( ENGvsWI )

दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर ख्रिस गेल आणि शिमरोन हेटमायरने सावध फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोईन अलीने हेटमायरला ९ धावांवर बाद करत विंडीजच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. पॉवर प्ले संपायच्या आतच टायमल मिल्सने विंडीजचा स्टार टी २० फलंदाज ख्रिस गेलला १३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ड्वेन ब्रोव्होही अवघ्या ५ धावांची भर घालून जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

७ षटकात ५ बाद ३७ धावा अशी दयनीय अवस्था झालेल्या विंडीजला सावरण्यासाठी कर्णधार कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी सुरुवात केली. मात्र टायमल मिल्सने पूरनला १ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाठोपाठ आदिल रशीदने आंद्रे रसेल ( ० ), कायरन पोलार्ड ( ६ ) आणि ओबेड मॅकोयला ( ० ) यांना आल्या पावली माघारी पाठवले. यामुळे विंडीजची अवस्था १३ व्या षटकातच ९ बाद ४९ अशी झाली. अखेर हुसैन आणि रवी रामपाल या अखेरच्या जोडीने विंडीजचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र या दोघांनीही संघाच्या धावसंख्येत ६ धावांच्या वर धावा जोडता आल्या नाहीत. विंडीजचा संपूर्ण डाव १४.२ षटकात ५५ धावात संपुष्टात आला.

Back to top button