Nashik : जनरल बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेचा प्रवासही झाला श्रीमंतांचा | पुढारी

Nashik : जनरल बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेचा प्रवासही झाला श्रीमंतांचा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गोरगरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्यांच्यासाठी विविध उपयायोजना करत आहेत, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनातर्फे त्याच्या विरुद्ध निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे बहुतांश रेल्वे गाड्यांमधून जनरलसोबत स्लीपर डब्यांची संख्या घटवून त्या जागी वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांना रेल्वे प्रवास महागडा झाला असून, विमानांप्रमाणे रेल्वेदेखील श्रीमंतांची होत चालल्याचे मत सर्वसामान्यांनी व्यक्त केले आहे.

देशात प्रवासाचे सर्वात स्वस्त साधन म्हणून रेल्वे ओळखले जाते. गाव, खेड्यापाड्यांसाठी पॅसेंजर, तर छोट्या-मोठ्या शहरांना जाण्यासाठी मेल, एक्स्प्रेस गाड्या आहेत. काही वर्षांपूर्वी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांत 12 ते 14 डबे असायचे. त्यात एसीचे तीन किंवा चार डबे, तर उर्वरित डबे जनरल आणि स्लीपरचे असायचे. दिवसेंदिवस प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, पंजाब मेल, दादर-अमृतसर एक्स्प्रेस दानापूर-पुणे एस्क्प्रेस यासह जवळपास सर्वच गाड्यांत डब्यांची संख्या 22 ते 24 पर्यंत वाढविली. डब्यांची संख्या वाढविताना जनरल, स्लीपर डब्यांची संख्या कमी करून त्याजागी एसी कोच वाढविण्यात आले आहेत.

मध्यमवर्गीय कमी प्रवासी भाड्यामुळे सर्वसाधारण किंवा स्लीपर डब्यातून प्रवास करतात. मात्र आता सर्वच रेल्वेत दोन ते तीनच डबे जनरल ठेवण्यात आले आहेत. पूर्वी स्लीपर डब्यांची संख्या 12 ते 14 असायची मात्र त्यातही कपात करण्यात आली असून, आता स्लीपरचे डबे फक्त पाच ते सहा ठेवण्यात आले आहेत. एसीचे भाडे जास्त असल्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब प्रवाशांना ते परवडणारे नाही.

रेल्वेने जनरल, स्लीपर कोच वाढवण्याची गरज असताना ते कमी करून एसीचे कोच वाढवणे चुकीचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवास करणे अवघड होऊन त्यांचे हाल होत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन जनरल आणि स्लीपर कोचची संख्या वाढवण्याची मागणी करणार आहे.

-नितीन पांडे, सदस्य, रेल्वे झोनल कमिटी आणि भाजप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष

हेही वाचा :

Back to top button