समनापूर प्रकरण ; पोलिसांनी निरपराधांवर कारवाई करू नये : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

समनापूर प्रकरण ; पोलिसांनी निरपराधांवर कारवाई करू नये : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  समनापूर दगडफेक प्रकरणी निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही. याचीही काळजी घेण्याच्या सूचना आपण जिल्हा पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. त्यामध्ये जे दोषी आहेत,ते कोणत्या धर्माचे आहेत, यापेक्षा कायदा हातात घेणार्‍यांच्या संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुखांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील समनापूर गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी झालेल्या दगडफेकीत तिघे जखमी झाले. तसेच काही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळाली त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला तत्काळ घटनास्थळी पोलिस फौज फाट्यासह पोहोचले. परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनुचित प्रकार टळला होता. मंत्री विखे पाटील संगमनेर तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. समनापूर येथील घटनेसंदर्भात पत्रकारांनी मंत्री विखे यांच्याशी संवाद साधला. असता विखे पाटील म्हणाले, सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेरात मोर्चा झाला. लोकांच्या भावना तीव्र होत्या. चाळीस-पन्नास हजार नागरिक त्यांच्या स्वतःच्या साधनाने मोर्चाला येतात. हे कशाचे प्रतीक आहे. त्यामुळे स्वाभाविकच लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तीव्र स्वरूपाच्या राहतील. याचा अर्थ दुसर्‍या धर्माचा द्वेष करावा, असे अजिबात नाही.

Back to top button