नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारी महिला गजाआड | पुढारी

नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारी महिला गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ७ ते १५ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतून एका महिलेस ताब्यात घेतले आहे. पूजा विशांत भोईर असे संशयित महिलेचे नाव असून तिच्याविरोधात इतर पोलिस ठाण्यांमध्येही फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे.

मे महिन्यात ३ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर रोडवरील रहिवाशी अतुल सोहनलाल शर्मा (६६) यांनी सरकारवाडा पोलिसांत संशयित पूजा विशांत भोईर आणि विशांत विश्वास भोईर (३५, दोघे रा. कल्याण, ठाणे) या संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. नाशिक पोलिसांनी संशयित पुजाचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला. तिला न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.८) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासास सुरुवात केली असून एक पथक मुंबईत तपास करीत आहे. संशयित पुजा हिने याआधीही राज्यभरातील अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर येत आहे. बालकलाकाराची आई म्हणून पुजाची ओळख असून सोशल मीडियावरून ती गुंतवणूकदारांशी संपर्क साधत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

अनेकांना गंडा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा व विशांत हे ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास जादा दराने परतावा देण्याचे आमीष दाखवत होते. सुरुवातीस ठरल्याप्रमाणे परतावा दिला. मात्र कालांतराने पैसे दिले नाही. गुंतवणूकदारांना दिलेले धनादेशही न वटल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले व त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button