रायगडी अवतरला शिवकाल; मर्दानी खेळ आणि शाहिरीची ललकारी | पुढारी

रायगडी अवतरला शिवकाल; मर्दानी खेळ आणि शाहिरीची ललकारी

पोलादपूर; समीर बुटाला :  शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर जल्लोष नवक्रांतीचा, जल्लोष स्वाभिमानाचा, असा अनुभव शिवभक्तांनी घेतला. गडावर सर्वत्र उत्साह संचारला होता. मर्दानी खेळांतील क्षण आणि क्षण प्रत्येक जण ‘याची देही याची डोळा’ अनुभवत होता. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांतील चपळता, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच क्षणात फिरणारी तलवार, लिंबाचा अचूक वेग घेणारी तलवारीची पात, अशा वेगवान हालचाली डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. टाळ्यांचा कडकडाट आणि शिवरायांच्या जयजयकारात किल्ले रायगड दुमदुमून गेला. शाहिरीच्या ललकारींनी गडावर शिवकालच उभा केला.

राज्यासह निपाणी, संकेश्वर, बेळगाव येथूनही हजारो शिवभक्त आले होते. मंगळवारी पहाटेच्या प्रहरात जल्लोष नवक्रांतीचा जल्लोष स्वाभिमानाचा या ललकारी आणि शिवगर्जनांनी किल्ले रायगड दुमदुमून गेला. त्याआधी सांगली आणि सोलापूरच्या हलगी वादकांनी गडावरील शिवभक्तांमध्ये वीरश्री आणि नवचैतन्य निर्माण केले होते. हलगीच्या कडकडाटाने आजीलाही ठेका धरायला लावला.
शासनाचे विविध विभागांतील हजारो कर्मचारी आणि अधिकारी उन्हातान्हाची तमा न बाळगता आगळ्या कर्तव्यनिष्ठेने आलेल्या शिवभक्तांना सेवा देत होते.

Back to top button