‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडा प्रकरण : ‘टीप’ सांगलीतून… टोळी परराज्यातील! | पुढारी

‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडा प्रकरण : ‘टीप’ सांगलीतून... टोळी परराज्यातील!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील ‘रिलायन्स ज्वेल्स’वर भरदिवसा गोळीबार करीत सशस्त्र दरोडा टाकणार्‍या टोळीचे महत्त्वाचे धागेदोरे अखेर मंगळवारी सांगली पोलिसांच्या हाती लागले. स्थानिक गुन्हेगाराने परराज्यातील सराईत टोळीला ‘टीप’ दिल्याने हा दरोडा पडल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. टोळीच्या शोधासाठी सांगली पोलिसांची सहा पथके उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व बिहार राज्यात रवाना झाली आहेत.

सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ वसंत कॉलनीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आठ जणांच्या टोळीने दरोडा टाकला. पुरुष व महिला कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधले. त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून सुमारे 15 कोटी रुपयांची लूट केली. याचदरम्यान एक ग्राहक पेढीत आला. दरोडेखोरांच्या हातातील रिव्हॉल्व्हर पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका दरोडेखोराने त्याच्यावर गोळी झाडली. गोळीचा नेमका चुकल्याने ग्राहक बचावला. मात्र पेढीच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच फुटली.
परराज्यातून माहिती मागविली

आव्हानात्मक बनलेल्या या दरोड्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे संजय मोरे यांची पथके 24 तास तपासात गुंतून आहेत. सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर ही दोन तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन तपासाला ‘दिशा’ देण्यात आली आहे. अशाप्रकारचे गुन्हे करणार्‍या टोळ्यांची संपूर्ण राज्यभरातून तसेच परराज्यातून माहिती मागविण्यात आली आहे. तपासासाठी नियुक्ती केलेल्या आठ पथकापैकी दोन पथके बाहेरील राज्यातील पोलिसांच्या संपर्कात आहेत.

वाहनांचे क्रमांक बोगस!

दरोडा टाकल्यानंतर टोळीतील सहाजण कारमधून गेले. अन्य दोघे दुचाकीवरून गेले. दुचाकीवरून गेलेले हे दोघे स्थानिक गुन्हेगार असल्याची खात्री पटली आहे. मिरजेतील समतानगरमध्ये त्यांनी दुचाकी लावली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासण्यात आले आहे. हे दोघेही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. मात्र तोंडाला मास्क बांधला असल्याने त्यांचा चेहरा ओळखून येत नाही. दुचाकीचा क्रमांक बनावट आहे. इंजिन व चेस क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतला जात आहे. भोसे (ता. मिरज) येथील शेतात कार सोडून सहा जणांनी पलायन केले. या कारचा क्रमांकही बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचाही इंजिन व चेस क्रमांक तपासला जात आहे. कारमधून जप्त करण्यात आलेली दोन्ही रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. यामधून गोळीबार झाला आहे का नाही, याच्या अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.

पथके परराज्यात रवाना!

‘रिलायन्स ज्वेल्स’वर पडलेल्या दरोड्यामागे परराज्यातील टोळी असण्याचे महत्वाची माहिती हाती लागली आहे. या टोळीला स्थानिक गुन्हेगाराने ‘टीप’ दिली आहे. ही टोळी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व बिहार राज्यातील असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची सहा पथके या राज्यात रवाना झाली आहेत. तेथील पोलिसांची मदत घेऊन टोळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगलीत तळ ठोकून आहेत. तपासाचा आढावा घेऊन ते मार्गदर्शन करीत आहेत.

Back to top button