नाशिक : सटाण्याजवळ ट्रकच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू, पाच गंभीर

नाशिक : सटाण्याजवळ ट्रकच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू, पाच गंभीर
Published on
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जेजुरी येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला शहरापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावरच मालट्रकने धडक दिल्याने येथील कारचालक व त्याचे काका जागीच मृत्युमुखी पडले, तर कारमधील नवदाम्पत्यासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. ५) सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास देवळा-सटाणा रस्त्यावर तुर्की हुडीजवळ हा अपघात झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी मालट्रक चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

सटाणा येथील नरेंद्र अभिमन सोनवणे (३०) यांचा नुकताच विवाह झाल्याने नवविवाहिता पूजा नरेंद्र सोनवणे (२४) व नातेवाईक सिंधूबाई रोहिदास पवार (६०), स्वामी ललित जाधव (८), साक्षी नंदकिशोर सोनवणे (१६), ललित पांडुरंग जाधव (४२) व नात्यातीलच चालक योगेश ऊर्फ दादू केदा जाधव (२०) हे मित्राच्या कारने (क्र. एम.एच.१८ बी.सी.५८९३) जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. सटाणा शहरापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावरच देवळाच्या बाजूने जाणारा वाळूचा मालट्रक (क्र. एम.एच.१८ बी.एच.५१३५)ने कारला समोरून जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात कारचालक योगेश ऊर्फ दादू जाधव व ललित पांडुरंग जाधव हे पुढे बसलेले दोघेही जागीच मृत्युमुखी पडले.

अपघाताबाबत समजताच जवळच्या रहिवासी व ग्रामस्थांनी तत्काळ धावून जात मदतकार्य सुरू केले. अपघात एवढा भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला, तर वाळूने भरलेला मालट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटा झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना प्रथम सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारार्थ मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मृत कारचालक योगेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले असल्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रवीण राजेंद्र गांगुर्डे (२८) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मालट्रकच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस हवालदार अजय महाजन पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news